गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण
व्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशनचा (Home Isolation) सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनीच ही माहिती ट्विटद्वारे दिली. मी माझी सर्व कामे घरातूनच करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय.
माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनाही गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना देखील डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. याआधी आमदार क्लाफसियो डायस, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार चर्चिल आलेमांव आणि उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रापाद नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना झाल्याने श्रीपाद नाईक यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी देखील करण्यात आली. तर, सुदिन ढवळीकरांवर देखील उपचार करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गोव्याने चांगले काम करत कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात ठेवला होता. मात्र नंतरच्या टप्प्यांमध्ये गोव्यातही करोनाचा संसर्ग पसरू लागला. अलिकडे देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोव्यातील वर्दळ वाढू लागली. गोव्याने आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे गोव्यात अनेक जण दाखल होत आहेत.