`बकरी ईद बकऱ्याशिवाय साजरी होईल तेव्हा दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी होईल`
उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे.
नवी दिल्ली : दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. मात्र कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सेशल मीडियावर याविषयी अनेक चर्चा होत आहे. फटाक्यामुळे प्रदुषण वाढतं आणि कोरोना काळात प्रदुषण वाढल्यास विषाणूचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फेसबुकवर त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'ज्या दिवशी बकरी ईद बकऱ्याशिवाय साजरी होईल तेव्हाच दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी होईल.' अशी पोस्ट साक्षी महाराजांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी देखील कमेंट करत आहेत.
शिवाय प्रदुषणाच्या नावाखाली फटाक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजळू नका, असं देखील ते म्हणाले आहे. सध्या देशात सर्वत्र फटाक्यांवर बंदी घातली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. म्हणून साक्षी महाराज यांनी टोला लगावला आहे.
कोणत्याही मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे ते कायम चर्चेत असतात. त्यांच्या या पोस्टवरुन आता दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. साक्षी महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.