Gujrat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidates List) आज जाहीर केली. पहिल्या यादीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडेजाला (Rivaba Jadeja) जामनगर नॉर्थमधून (Jamnagar North Seat) उमेदवारी देण्यात आली आहे. रिवाबाने 3 वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्याचबरोबर ती अेक सामाजिक संस्थांशी जोडली गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे रिवाबा जडेजा?
रिवाब जडेजा ही गुजरातमधल्या राजकोट इथं रहाणारी असून तिचे वडिल मोठे उद्योगपती आहेत. रिवाबा इंजिनिअरिंगची विद्यार्थी असून महाविद्यालयीन जीवनापासूनच ती सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. 2016 मध्ये रिवाबाने क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न केलं. 


करणी सेनेत होती सक्रिय
राजपूत समाजाच्या करणी सेनेत (Karni Sena) रिवाबा जडेजा सक्रिय होती. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी रिवाबाने भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या अनेक कार्यक्रमात रिवाबा दिसली आहे. 


राजकोटमध्ये रेस्टॉरंट, जामनगरमध्ये घर
रिवाबा जडेजा काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते हरिसिंह सोलंकी यांची नातेवाईक आहे. राजकोटमध्ये जडेजा कुटुंबाचं 'जड्डूस फूड फिल्ड' नावाचं रेस्टोरंट आहे. तर जामनगरमध्ये त्यांचा अलिशान बंगला आहे. 


रवींद्र जडेजाचं राजकीय कुटुब
रवींद्र जडेजाचे वडिल अनिरुद्ध जडेजा आणि बहिण नैना जडेजा हे देखील राजकारणात आहेत. नैना जडेजा जामनगरमध्ये महिला काँग्रेस अध्यक्षा आहेत. रविंद्र जडेजा 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर बहिण नैनानेच रवींद्र जडेजाचं पालन पोषण केलं. इतकंच नाही तर त्याला क्रिकेट खेळण्याला प्रोत्साहनही दिलं.


गुजरात विधानसभा निवडणूक कधी?
गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर केला जाणार आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकत सत्ता स्थापन केली. तर काँग्रेसला 77 जागा मिळवता आल्या होत्या.