एका `अंडरवेअर`मुळे संपूर्ण गावात धुमशान, 8 जण रुग्णालयात... वाचा नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरुय. एका अंडरवेअरमुळे अख्ख्या गावात राडा झालाय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. तर या घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
Crime News : आजपर्यंत आपण पैसे, जमीन किंवा एखादा जुना वाद यातून भांडणे होताना पाहिली असतील. या वादातून अनेकदा धक्कादायक जीवघेण्या घडल्याचेही समोर आले आहे. पण कधी अंडरवेअरवरुन (underwear) हाणामारी झाल्याचे तुम्ही ऐकले आहे का? नाही ना. पण असं घडलं आहे तेही आपल्या भारतात. उत्तर प्रदेशात (UP News) घडलेल्या या विचित्र घटनेमुळे तुम्हाला हसू आवरता येणार नाही. अंडरवेअरमुळे झालेल्या भांडणामुळे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
उत्तर प्रदेशातल्या आझमगडमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. आझमगड शहरात काही लोकांमध्ये भांडण झाले होते. सुरुवातीला हा वाद दोन लोकांमध्ये होता. मात्र काही वेळातच हे प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत पोहोचले. हा वाद सोडवायला आणखी दोघेजण पुढे आले. मात्र वाद सोडवता सोडवता तेही हाणामारीत सहभागी झाले. थोड्याच वेळात दोन गट पडले आणि जोरदार हाणामारी सुरु झाली. हा वाद सोडवण्यासाठी दोन वृद्ध देखील पुढे आले होते. मात्र ते दोघेही दोन्ही गटांमध्ये सहभागी झाले आणि हाणामारी करु लागले.
त्यानंतर आणखी दोन लोक तिथे धावत आले आणि भांडण करणाऱ्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा तेच झाले आणि तेसुद्धा यामध्ये सामील झाले. ठोसे, लाथा, काठी आणि जे काही हाती आले त्याने हाणामारी सुरु झाली. एकवेळ अशी आली की संपूर्ण परिसर या भांडणात उतरला. अर्धा तास चाळीस मिनिटे हे भांडण सुरु होते. शिवीगाळ, चापट, लाथाबुक्क्या सर्वकाही या भांडणात पाहायला मिळाले. थकल्यानंतर सगळे जण आपल्या जखमा घेऊन बाजूला बसले.
काही वेळातच तिथल्या काही लोकांनी ही बाब जवळच्या पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भांडणात सहभागी असलेल्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी भांडणाचे कारण शोधण्यास सुरुवात केली.
कटरा परिसरातील रहिवासी असलेल्या सुरेंद्र सिंहचा शेजारी गुड्डू सिंगसोबत जुना वाद होता. त्यांच्यात रोज भांडणे होत होती. गुड्डू सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून सोमवारी रात्री अंडरवेअर वाळवण्याच्या किरकोळ वादातून सुरेंद्र सिंग आणि त्यांची पत्नी अनिता कौर यांना लाठ्या आणि विटांनी मारहाण करत जखमी केले. सुरेंद्र आणि त्यांच्या पत्नीला नातेवाइकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जखमी सुरेंद्र सिंग यांचा आरोप आहे की गुड्डू हा आरोपी आहे आणि जुन्या वादातून नेहमीच वाद उकरून काढत होता. यावेळी अंडरवेअर वाळवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. घराशेजारी अंडरवेअर वाळवण्यावर सुरेंद्र सिंग यांनी आक्षेप घेतला. यावरुन त्यांना गुड्डूने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हाणामारी सुरु झाली आणि परिसरच यामध्ये तुटून पडला. यामध्ये आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.