Crime News : राजस्थानच्या (Rajasthan Crime) पाली जिल्ह्यात शनिवारी तरुणाने वृद्ध महिलेची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह खाण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हे दृश्य पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. घाईघाईत त्याने परिसरातील लोकांना बोलावून घेतले. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक लोकांनी 24 वर्षीय आरोपीला पकडून पोलिसांच्या (Rajasthan Police) ताब्यात दिले. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आरोपीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानात वृद्ध महिलेची हत्या करून तिचे मांस खाल्ल्याचा आरोप असणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला हायड्रोफोबिया (hydrophobia) झाल्याच्या समोर आले असून आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेंद्र ठाकूर असे आरोपीचे नाव असून तो मुंबईचा (Mumbai) रहिवासी आहे. सराधना गावात राहणारी वृद्ध महिला जंगलात घेऊन गेली होती. यावेळी तरुणाने तिच्यावर हल्ला केला. सुरेंद्र ठाकूर वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केलं. यानंतर सुरेंद्रने वृद्ध महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने आपला शर्ट काढला आणि महिलेचा चेहरा झाकला.


सुरेंद्र जेव्हा महिलेचा मृतदेह खात होता, तेव्हाच तिथे असलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार पाहिला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'मी तिथून परतत होतो. तेव्हा मी एका तरुणाला वृद्ध महिलेचे मांस खाताना पाहिले. हे बघून मी एकदम घाबरलो. मी तिथून पळ काढला. आरोपीचा चेहरा रक्ताने माखलेला होता. आरोपीला पाहताच परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक लोक घाबरले. त्यानंतर लोकांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले."


पोलिसांनी काय सांगितले?


पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपी हा मानसिकरित्या आजारी असल्याचे दिसत आहे. तो अतिशय आक्रमकपणे वागत आहे. ज्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे तिथे त्याने गोंधळ घातला आहे. त्याला बेडवर बांधून वैद्यकीय कर्मचारी उपचार करत आहेत. आरोपी मुंबईहून पाली येथे आला होता. त्याच्याकडे बसचे तिकीट सापडले आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि नरभक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."


बांगर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, "ठाकूर हा हायड्रोफोबियाने ग्रस्त आहे, रेबीज संसर्गानंतर होणारा हा एक रोग आहे ज्यामध्ये पीडित व्यक्ती पाण्याला घाबरते. सुरेंद्र ठाकूरला यापूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याने याच्याव उपचार न केल्याने त्याला हायड्रोफोबियाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याप्रमाणे आक्रमकपणे वागत आहे. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्याने हॉस्पिटलमध्येही गोंधळ घातला, त्यानंतर नर्सिंग स्टाफने त्याला बेडवर बांधून ठेवले आहे."