Lesbian असल्याचा आरोप करत दोन मैत्रिणींना अमानुष मारहाण, इलेक्ट्रीक रॉडने... संतापजनक घटना
तरुणींना अमानुश मारहाण करणाऱ्यांमध्ये नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा समावेश, पोलिसांनी दोन जणांना केली अटक
Shocking News : आज जगातील बहुतांशी प्रगत देशांनी समलिंगी (LGBT) विवाहांना मान्यता दिली आहे. पण भारतात (India) आजही समलिंगी संबंधांचा स्विकार केला जात नाही. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन प्रेमी तरुणींना काही लोकांनी अमानुष मारहाण केली. इतकंच नाही तर एक तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला इलेक्ट्रीक रॉडने चटकेही दिले. यावरच हे नराधम थांबले नाहीत तर त्यांनी तरुणींवर बलात्काराचाही प्रयत्न केला.
मारहाण करणाऱ्यांमध्ये नातेवाईक
गंभीर जखमी झालेल्या तरुणींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरुणींच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानंतर तीन जणां विरोधात सागरडिघी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे तरुणींना मारहाण करणाऱ्यांमध्ये एका तरुणीचे दोन जवळचे नातेवाईक आहेत, तर एक जण शेजारी आहे. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे.
रात्री उशीर झाल्याने ती मैत्रीणीच्याच घरी थांबली पण...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोनही तरुणी 21 ते 22 वर्ष वयोगटातील आहेत. या दोनही तरुणी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. 25 ऑक्टोबरला यातल्या एका तरुणीने दुसऱ्या तरुणीला फोन करत आपण आजारी असल्याचं सांगत भेटायला बोलावलं. दुसरी तरुणी तिला भेटायला गेली. निघायला रात्री उशीर झाल्याने तीने मैत्रिणीच्याच घरी थांबण्याचा निर्णय घेतला.
तीन जण घुसले घरात
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आजारी तरुणीचे दोन नातेवाईक अचानक तिच्या घरात घुसले. त्यांच्याबरोबर तरुणीचा शेजारीदेखील होता. तुम्ही दोघी एकाच बेडवर का झोपला होतात याचा जाब विचारला. तसंच तुम्ही दोघी रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगत त्या तिघांनी तरुणींना मारहाण करायला सुरुवात केली. तरुणींनी आरडाओरडा केला पण त्यांना जराही दया आली नाही. आरोपींनी त्या तरुणींवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला. यानंतर आरोपींपैकी एकाने इलेक्ट्रीक रॉडने एका तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला चटके दिले. त्यानंतर ते तिघेही तिथून फरार झाले. ही घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी तरुणींना दिली.
याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एका आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेनंतर परिसरताली नागरिकही संतप्त झाले असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.