कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा
लहानांपासून प्रौढांपर्यंत जवळपास सर्वांनाच सेल्फीचं वेड असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या आनंदाचे क्षण या सेल्फीत क्लिक करताना दिसतात. अशाच प्रकारे सेल्फी क्लिक करणं महागात पडल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : लहानांपासून प्रौढांपर्यंत जवळपास सर्वांनाच सेल्फीचं वेड असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या आनंदाचे क्षण या सेल्फीत क्लिक करताना दिसतात. अशाच प्रकारे सेल्फी क्लिक करणं महागात पडल्याचं समोर आलं आहे.
सेल्फी सोशल मीडियात व्हायरल
मुझफ्फरनगर कारागृहात काही कैद्यांनी मजा-मस्ती करताना एक सेल्फी क्लिक केला आणि हा सेल्फी आता सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
कारागृह प्रशासनाला झटका
जिवघेणा हल्ला करण्याच्या आरोपात कारागृहात असलेल्या एका आरोपीने इतर दोन कैद्यांसोबत सेल्फी क्लिक केला. त्यानंतर हा सेल्फी फेसबुकवर अपलोड केल्याने तो व्हायरल झाला. सध्या या व्हायरल सेल्फीची खूपच चर्चा होत आहे. या सेल्फीची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचताच कारागृह प्रशासनाला एकच झटका बसला आहे.
कारागृहात तपासणी सत्र
कारागृह प्रशासनाने तात्काळ संपूर्ण कारागृहातील बरॅकची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. काहागृह अधिक्षकांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आम्ही गेल्या दोन दिवसांत कारागृहातून २ मोबाईल फोन्स जप्त केले आहेत."
सेल्फीची मजा
मुझफ्फरनगर कारागृहात कैद्यांनी घेतलेल्या या सेल्फीत सर्वजण मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यामुळे कारागृहात नेमकं काय चालतं आणि कशा प्रकारे कैदी मस्ती करत असतात हे सर्वांसमोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या सेल्फीतील आरोपीचं नाव विजय चौधरी असं असल्याचं समोर येत आहे. डीएव्ही कॉलेजच्या बाहेर गोळीबार करण्याच्या आरोपात विजय चौधरीला पोलिसांनी अटक केलं होतं.