नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन आसाममध्ये हिंसक आंदोलन, गुवाहाटीमध्ये कर्फ्यू
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन आसाममध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन आसाममध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. आज संध्याकाळी ६.१५ ते उद्या सकाळी ७ वाजेपर्यंत गुवाहाटीमध्ये कर्फ्यू असणार आहे. याचसोबत आसामच्या १० राज्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
आसामची राजधानी असलेल्या दिसपूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी एका सरकारी बसला आग लावली. तर अनेक ठिकाणी चक्काजाम केला. या आंदोलनामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्बदानंद सोनोवाल बरेच तास गुवाहाटी विमानतळावर अडकून पडले.
नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे बांगलादेशींना नागरिकत्व मिळेल, ज्यामुळे आसामच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख पुसण्याचा धोका आहे. या विधेयकामुळे आसामच्या स्थानिक नागरिकांना नोकरी आणि अन्य संधींमध्ये नुकसान होईल, अशी भीती आंदोलनकर्त्यांना आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. या विधेयकावरुन आसामच्या जनतेला भ्रमित केलं जात आहे. सरकार आसामच्या जनतेच्या सगळ्या चिंता लक्षात घेईल. क्लॉज-६ नुसार स्थापन करण्यात आलेली समिती सगळ्या चिंतांची योग्य दखल घेईल, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.