बंगळुरु : कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कर्नाटकात राजीनामा नाट्य थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात अधिकच भर पडत आहे. अगोदर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी करत मुंबई गाठलेली आहे. आता काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. के सुधाकर आणि एमटीबी नागराज या आमदारांनी काँग्रसकडे राजीनामे दिलेत. मात्र, आपण काँग्रेसमध्ये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडत आहे. ते भाजपमध्ये जाणार का, याची उत्सुकता आहे. जेडीएस आणि काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ कमी होत असल्याचे याचा सध्या विरोधात असणाऱ्या  भाजपला होणार आहे.



दरम्यान, काल सकाळी कर्नाटकातून मुंबई आलेल्या काँग्रेस आमदारांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अन्य काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसांनी आमदारांची भेट घेऊ न देता ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना संध्याकाळी सोडण्यात आले. दरम्यान, शिवकुमार यांना कर्नाटकात माघारी पाठविण्यात आले आहे.