नवी दिल्ली: देशातील सध्याचे सरकार अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा आपले सामाजिक आणि राजकीय हेतू पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मरगळ आली आहे, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. भारताने अजूनही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यास भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेऊ शकते. मात्र, दुर्दैवाने गेल्या काही काळात केवळ राजकारणच होताना दिसत आहे, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते ब्लुमबर्ग या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या निराशाजनक कामगिरीविषयी विचारणा करण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्थेत विकासाची क्षमता असूनही कोणत्या घटकांमुळे ही वाढ रोखली जात आहे, असा प्रश्न यावेळी रघुराम राजन यांना विचारण्यात आला. 


Trump on CAA:'मला आशा आहे, भारत योग्य निर्णय घेईल'


यावेळी रघुराम राजन यांनी म्हटले की, सध्याच्या सरकारने निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:चा राजकीय व सामाजिक अजेंडा पूर्ण करण्याला अधिक प्राधान्य दिले. अगोदरच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दोषपूर्ण अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. दुर्दैवाने, सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले. 


नुकत्याच जाहीर झालेल्या आकेडवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.७ टक्के इतका नोंदवण्यात आला. ही गेल्या सात वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे. मात्र, केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव अतनू चक्रबर्ती यांनी आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेईल, असा दावा केला होता. भारतीय अर्थव्यवस्थेने यापूर्वीच तिचा तळ गाठला आहे आणि यापुढे उभारीचेच संकेत दिसून येतात. गेल्या दोन महिन्यातील निर्मिती क्षेत्राच्या वाढीमुळे या उभारीला प्रोत्साहन मिळाले आहे. हे क्षेत्र यापुढेही वाढीचा क्रम दर्शवेल, असे त्यांनी म्हटले होते.