टपरीवरचा चहा महागणार
चहाप्रेमींच्या खिशाला मोठा फटका
मुंबई : देशभरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, कांदा, टोमॅटो यांच्या दरात वाढ झाली आहे. या पाठोपाठ आता 'टपरी'वरचा चहा महागणार आहे. मुंबई आणि उपनगरांमधील पाच हजारहून अधिक चहा टपरी मालक आहेत. त्यांची ही मागणी केली आहे. चहा टपरी मालक टी ऍण्ड कॉफी असोसिएशनचे सभासद आहेत. या संघटनेकडे त्यांनी कटींग चहाचे दर वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता चहाप्रेमींना महागाईची झळ पोहोचणार आहे.
चहा टपरी मालकांनी कटींग चहाचे दर हे एक ते दोन रुपयांनी वाढवण्यास संघटनेला सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून दूध, साखर, चहा पावडर आणि एलपीजी गॅसमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे फार नफा होत नसल्यामुळे कटींगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
असोसिएशनकडे 1 ते 2 रुपये वाढ करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. मात्र असोसिएशनचा निर्णय हा काही चहा टपरी मालकावर बंधनकारक नाही. चहा आणि कॉफी असोसिएशनची चार वर्षांपूर्वीच सुरूवात झाली आहे. या असोसिएशनमार्फत चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित, स्वच्छता आणि ग्राहकांशी संबंध याविषयांवर मार्गदर्शन केले जाते.
चहा प्रेमी मुंबईकर कामाच्या दिवसात चार ते पाच कप चहा पितात. यानुसार 5 ते 10 रुपये दिवसाला खर्च केला जातो. तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहिर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये अन्नपदार्थांसंदर्भातील महागाईचा दर 11.8 टक्क्यांनी वाढला आहे.
टी ऍण्ड कॉफी असोसिएशनचे संस्थापक प्रमोद वाकोडेंनी दिलेल्या माहितीनुसार, चहा मालकांनी दरात वाढ केली नाही तर त्याचे परिणाम चहाच्या दर्जामध्ये दिसून येईल. पुढे ते म्हणाले की,'अर्धा लीटर दुधाची किंमत 2 रुपयांनी महागल आहे. तर चहापत्ती म्हणजे चहा पावडरची किंमत ही 25 ते 30 रुपयांनी महागली आहे. साखरेची किंमत प्रत्येकी किलो मागे 2 रुपयांनी महागली आहे. यामुळे चहाच्या दरात वाढ होणार आहे.'