एटीएममध्ये Fevikwik टाकून करायचे मदतीचे नाटक अन् मग... चोरीचा खळबळजनक प्रकार समोर
Noida Cyber Fraud: नोएडा येथून पोलिसांनी एटीएममधून पैसे चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चोरांची चोरीची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
Cyber Crime : एटीएमध्ये (ATM) फसवणूक करुन लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एटीमए मशिनबाबत जास्त माहिती नसल्याने मदत करण्याच्या बहाण्याने अनेक भुरटे चोर कधी फसवणूक करतात हे कळत सुद्धा नाही. यासाठी नवीन नवीन कल्पनांचा ते वापर करत असतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडात (noida) समोर आला आहे. एखादी वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेविक्विकचा (fevikwik) वापर एटीएममधून पैसे चोरणाऱ्या चार जणांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चौघांनाही फसवणुकीच्या कलमांखाली तुरुंगात पाठवले आहे.
एटीएम कार्ड अडकवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नोएडा पोलिसांनी चौघा भामट्यांना अटक केली आहे. नोएडा पोलिसांकडे सतत फसवणूकीच्या तक्रारी येत होत्या. हे चारही आरोपी एटीएम मशीनमध्ये फेविक्विक टाकायचे. यानंतर एखादा ग्राहक येऊन मशीन वापरताच त्याचे कार्ड अडकायचे. यानंतर या टोळीतील सदस्य बँक कर्मचारी असल्याचे भासवत येऊन कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या व्यक्तीकडून कार्ड क्रमांक काढायचे. यानंतर टोळीचे सदस्य त्या व्यक्तीला कार्ड परत करण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ मागत असत. ती व्यक्ती तिथून निघून येताच आरोपी कार्डमधून पैसे काढून घेत असत.
त्यानंतर नोएडा पोलिसांनी 10 जून रोजी पंचशील अंडरपासवरून याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. प्रशांत तोमर, आदित्य शाक्य, पवन आणि गौरव यादव अशी आरोपींची नावे आहेत. नोएडाचे पोलीस उपायुक्त हरीश चंदर यांनी सांगितले की, "आम्हाला माहिती मिळाली की काही लोक एटीएममध्ये संशयास्पद स्थितीत फिरत आहेत. यापूर्वी सेक्टर 24 आणि 49 मध्येही अशा घटना घडल्या होत्या. तपासाच्या आधारे चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या प्रशांत होता."
"हे लोक कार्ड रीडरमध्ये फेविक्विक टाकायचे. जेव्हा कोणी पैसे काढायला यायचे आणि त्या एटीएममध्ये कार्ड टाकायचे, तेव्हा ते कार्ड चिकटायचे. त्यामुळे कार्ड आतही जाऊ शकत नव्हते आणि बाहेरही येऊ शकत नव्हते. खूप प्रयत्न केल्यावर ग्राहक नाराज व्हायचा. यावेळी टोळीतला एक मुलगा बँक कर्मचारी असल्याचे भासवून त्यांना हा टोल फ्री नंबर आहे, त्यावर कॉल करा असे सांगायचा. त्या टोल फ्री क्रमांकावर ग्राहक कॉल करायचे. त्यावर 3 तासांनी तुम्ही येऊन कार्ड घेऊन जा असे सांगून फसवणूक केली जायची," असे हरीश चंदर म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून बनावट ओळखपत्र, चोरी केलेले 5 हजार रुपये, बनावट हेल्पलाइन नंबरच्या स्लिप, चार चाकू, दोन मोबाईल, स्कूटी आणि मोटार सायकल जप्त केली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहे, ज्यामध्ये आरोपी घटनास्थळावरून निघून जाताना दिसत आहेत.