Cyclone Gulab: गुलाब या चक्रीवादळानं आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडक दिली. रात्री उशिरानं प्रतितास 95 किलोमीटर वेगाने हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि विशाखापट्टणम किनारपट्टीवर आदळलं. सदर वादळामुलं आंध्र प्रदेशातील सहा मासेमार बंगालच्या खाडीत बेपत्ता झाल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक घरांचं नुकसान झालं असून, वृक्षही उन्मळून पडल्याचं वृत्त आहे. हवामान खात्यानं दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर तातडीनं वादळामुळं प्रभावित भागांमध्ये बचाव कार्यास सुरुवात झाली. 


हवामान खात्याच्या माहितीनुसार वादळापूर्वी 75 ते 85 किमी प्रती तास वेगाने वारे वाहत असून, त्यामुळं किनारी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गुलाब चक्रीवादळ ओडिशातील गोपाळपूरपासून 125 किमीवर होतं. तर, आंध्रपासून हे वादळ 160 किमीवर होतं. 


वादळामुळं येणाऱ्या संभाव्य़ संकटाचा अंदाज घेत ईस्ट कोस्ट रेल्वेनं 34 रेल्वे रद्द केल्या. याशिवाय 13 रेल्वेंच्या वेळातही बदल करण्यात आला आहे. 17 रेल्वेंचा मार्गही बदलण्यात आला आहे. 



दरम्यान, महाराष्ट्रातही वादळाचे परिणाम दिसून येणार आहेत. पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, चंद्रपुरात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार ते अतीमुसळधार पावसासोबतच राज्यातील बहुतांश भागांमध्ये सोसाट्याचे वारेही वाहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.