Cyclone Jawad Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) अलर्ट जारी केला आहे येत्या 24 तासांत जवाद चक्रिवादळ (Cyclone Jawad) धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसंच 5 डिसेंबरपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे.


या राज्यांना चक्रिवादळाचा धोका
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाला जवाद चक्रिवादळाचा सर्वाधिक धोका आहे. जवाद चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात हवामान खराब होण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होत असून ते 4 डिसेंबर पर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यांजवळ राहणाऱ्या मच्छिमारांना याबाबत सतर्क करण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे.


पश्चिम बंगालला धोका
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ जवादमुळे पश्चिम बंगालच्या पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात 4 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, झारग्राम आणि हावडा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


गुजरातमध्ये बोट बुडाली
चक्रीवादळापूर्वी गुजरातच्या गीर सोमनाथमध्ये जोरदार वारे वाहत असून, त्यामुळे गीर सोमनाथच्या नवा बंदरमध्ये 13 ते 15 बोटी बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर 10 ते 15 मच्छीमार बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.


मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वातावरणामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.