चैन्नई : तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी  करण्यात आला आहे. ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले.


बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रात शुक्रवारी बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य नौदलाने सुरू केले असून, समुद्र खवळलेला आहे. वादळानंतर जोरदार पाऊस झाला आहे. दोन्ही राज्यांत पाऊस कोसळत असून आता हे वादळ लक्षद्वीपकडे सरकत आहे.चक्रीवादळ आणि पाऊस कोसळत असल्याने खरबरादारीचा उपाय म्हणून चेन्नई,  मदुराईसह अनेक शहरांतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 


वादळ अरबी समुद्राच्या दिशेनं


दरम्यान ओखी चक्रीवादळानं उग्र रुप धारण केलं असून, अरबी समुद्राच्या दिशेनं ते सरकू लागलं आहे. केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत असून केरळमध्ये किमान १२ जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. समुद्रात भरकटलेल्या  २१८ मच्छिमारांची नौदलानं सुखरुप सुटका केलीये. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. 


ताशी १३० किमी वेगाने वारे 


दरम्यान, वादळाचा वेग ताशी ११० ते १२० किमी होता. पुढील २४ तासांत लक्षद्वीपमध्ये ताशी १३० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले. लक्षद्वीप येथे काही ठिकाणी २० सेमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.