चेन्नई :  दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, सर्व आपत्ती पुनर्वसन केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. 


 तुफान वारा आणि मुसळधार पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण किनारपट्टीवर काल ओखी चक्रीवादळ धडकले. वादळामुळे कन्याकुमारी आणि थिरुअनंतपूरम या किनारपट्टीच्या भागात तुफान वारा आणि मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस आणि चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.


मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान



ओखी चक्रीवादळ लक्षद्वीप बेटांकडे झेपापले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे कन्याकुमारी, नागरकोलाई, थिरुअनंतपुरम आणि कोलाम या जिल्ह्यांसह लक्षद्वीपमधील काही भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. 


या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आली आहे.  थिरुअनंतपुरमधील शाळा आज बंद राहणार आहेत. त्याचबरोबर कन्याकुमारी आणि थिरुअनंतपूरम दरम्यानच्या अनेक लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात.


सहा मच्छिमारांच्या बोटी बेपत्ता


वादळ झाल्याने केरळमधील कोलम शहरात एका रिक्षा चालकाच्या अंगावर झाड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंद महासागरात अडकलेल्या सहा मच्छिमारांच्या बोटींच्या शोधकार्यासाठी नौदलाची तीन जहाजे आणि दोन विमाने रवाना झाली आहेत. तसेच एक मरिन इंजिनिअरिंग जहाज विझिंजम येथे भरकटले आहे.



केरळमधील सुमारे ८० मच्छिमार बेपत्ता असल्याचे वृत्त असून एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.