Dad Chases Leopard Saves Daughter: बिबट्याच्या हल्ल्यातून एका वडिलांनी आपल्या 6 वर्षीय मुलीला वाचवल्याची घटना कर्नाटकमधील व्याघ्र प्रकल्पामध्ये घडली आहे. बीआरटी व्याघ्र प्रकल्पातील कोल्लेगला प्रभागामधील काग्गलीगुंडी पोडू येथे सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या ठिकाणी राहणाऱ्या रामू नावाच्या व्यक्तीच्या सुशीला नावाच्या मुलीला बिबट्याने पळवलं. ही मुलगी अंगणामध्ये एकटीच खेळत असताना बिबट्याने तिला ओढत जंगलात नेलं. हल्ला झाला तेव्हा मुलीबरोबर कोणीही नव्हतं. सुशीला मोबाईलवर खेळत असातनाच बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खेचून घेऊन जाऊ लागला. त्यानंतर सुशीलाने आरडाओरड सुरु केला. आपल्या मुलीचा आरडाओरड ऐकून घराबाहेर आलेल्या रामूला पाहून बिबट्या मुलीला खेचून नेऊ लागला. त्यावेळी रामू आणि त्याच्या शेजाऱ्यांनी या बिबट्याचा पाठलाग सुरु केला. 


मुलीला खड्ड्यात टाकलं अन् पळाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामू आणि इतर काही लोक पाठलाग करत असल्याने बिबट्याने काही अंतरावर असलेल्या 10 फूट खोल खड्ड्यामध्ये या मुलीला टाकलं आणि तिथून पळ काढला. या छोट्या गावाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनीच हे मोठ्या आकाराचे खड्डे वन्यप्राण्यांपासून वाचण्यासाठी तयार केले आहेत. वन्यप्राण्यांनी खास करुन हत्ती आणि बिबट्या, वाघ यासारख्या हिंसक प्राण्यांनी गावात प्रवेश करु नये म्हणून हे खड्डे खणण्यात आले आहेत. 


मुलीवर उपचार सुरु


रामू आणि त्याच्या शेजाऱ्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे सुशीलाचा जीव वाचला असला तरी तो आणि त्याची त्याची पत्नी ललिता यांना या प्रकरणाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. अशाप्रकारे येथील एखाद्या बिबट्याने गावातील व्यक्तीवर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे, असं बीआरटीच्या निर्देशक दिपा जे यांनी सांगितलं आहे. सुशीलाच्या जबड्याला खालील बाजूस फ्रॅक्चर झालं आहे. तसेच तिच्या चेहऱ्याला आणि मानेला किरकोळ दुखापत झाली आहे. तिच्यावर मैसूरमधील के. आर. हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थीर आहे, असंही दिपा यांनी सांगितलं.


गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा


या गावाच्या आजूबाजूला हिंसक जनावरांचा वावर असल्याच्या तक्रारीनंतर या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आहेत. या प्राण्यांवर नजर ठेवण्याचं काम या कॅमेरांच्या माध्यमातून केलं जातं. सुशीला बरोबर घडलेल्या घटनेनंतर गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जंगलात वावरताना सावध रहावे, हातात काठी ठेवावी, एकट्यानेच जंगलातून जाताना अचानक जमीनीवर बसण्याआधी किंवा सरपाणाची लाकडं गोळा करताना आजूबाजूचा परिसर नीट पहावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेनंतर ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे आता बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा रचला आहे.