`दलित` शब्दावर बंदी, पण या शब्दाचा इतिहासही जाणून घ्या...
...याच आधारावर शेड्युल कास्ट (अनुसुचित जाती) शब्द अस्तित्वात आला
मुंबई : सरकारनं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायजरी जारी करून खाजगी टीव्ही चॅनल्सला 'दलित' शब्द वापरण्यावर बंधनं आणलीत. परंतु, याविरुद्ध अनेक जण पुढे आलेत. भाजप खासदार उदित राज आणि गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील या शब्दाला दलित अस्मितेशी जोडलंय. 'दलित' या शब्दाऐवजी सरकारनं 'अनुसुचित जाती' या शब्दाच्या वापराचा आग्रह धरलाय... परंतु, त्यांनी हा आग्रह धुडकावून लावलाय. त्यामुळे, या शब्दाच्या वापरा अगोदर किंवा बंदी अगोदर 'दलित' या शब्दाचा इतिहास जाणून घेणं, योग्य ठरेल...
'दलित' शब्दाचा पहिल्यांदा वापर
आधुनिक इतिहासात 200 वर्षांपूर्वी या शब्दाच्या वापराचा पहिला पुरावा मिळतो. ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीचा आर्मी ऑफिसर जे जे मोल्सवर्थ यांनी एका मराठी-इंग्रजी डिक्शनरीचं प्रकाशन 1831 मध्ये केलं होतं. यामध्ये 'दलित' शब्दाचा उल्लेख आढळतो.
त्यानंतर समाज सुधारक ज्योतिबा फुले (1827-1890) यांनी दलित शब्दाचा व्यापक वापर करत हा शब्द समाज जाणीवेशी जोडला. त्यापूर्वी या समाजासाठी अस्पृश्य, अंतज यांसारख्या शब्दांचा वापर केला जात होता. ज्योतिबा फुले यांनी मागास वर्गीय आणि अस्पृश्यांसाठी शुद्र, अति-शुद्र तसंच दलित-पटदलित शब्दांचा वापर केला. त्यामुळे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी 'दलित' हा शब्द चलनात आला.
'अनुसुचित जाती'
बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी 1935 मध्ये 'अस्पृश्यां'च्या एका सभेचं आयोजनसाठी एक पत्रक काढलं होतं. यामध्ये 'दलित' शब्दाचा वापर करण्यात आला होता. परंतु, ते खाजगीत डिप्रेस्ड क्लास (Depressed Classes) म्हणजे 'वंचित समाज' या शब्दाचा वापर करत असतं. याच वर्षी इंग्रजांनी इंडिया अॅक्ट (1935) मध्ये 'अस्पृश्यां'ना एका शेड्युल (अनुसुची) मध्ये जागा दिली. याच आधारावर शेड्युल कास्ट (अनुसुचित जाती) शब्द अस्तित्वात आला.
महात्मा गांधींचा 'महाजन'
याच दरम्यान महात्मा गांधी यांनी या समाजासाठी 'हरिजन' या शब्दाचा वापर केला आणि याच नावानं एक वर्तमानपत्रंही सुरू केलं. त्यानंतर काँग्रेसनंही याच शब्दाचा वापर सुरू केला. 1970 च्या दशकापर्यंत हा सर्वात प्रभावी शब्द ठरला.
दलित पँथर्स
1972 मध्ये महाराष्ट्रात दलित आंदोलनाला नवी दिशा देण्यासाठी 'दलित पँथर्स'ची स्थापना झाली. यासोबतच दलित शब्दाचा वापर पुन्हा एकदा वाढला. त्यातच 1981 मध्ये कांशीराम यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती (डीएस4) ची स्थापना केली. त्यानंतर बीएसपीची स्थापना करण्यासोबतच कांशीराम यांनी महात्मा गांधीच्या 'हरिजन' या शब्दावर जोरदार टीका केली. 'जर आम्ही ईश्वराचे संतान असू तर इतर जातींचे लोक राक्षसाचे संतान आहेत का?' अशा जळजळीत शब्दांत त्यांनी या शब्दावर आक्षेप घेतला. त्यानंतर या समाजाच्या अस्मिता आणि गौरवासाठी 'दलित' या शब्दाचा 1990 च्या दशकापासून आत्तापर्यंत सर्वात जास्त वापर झाला.