केरला स्टाईलमध्ये दांडिया उत्सव; शशी थरुर यांनी शेअर केला भन्नाट Video
Dandiya in Kerala style : केरळमध्ये देखील गुजराती दांडियाची क्रेझ दिसून येतीये. काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.
Shashi Tharoor shares video : सध्या संपूर्ण भारतात नवरात्र उत्सव (Navratri Festival) साजरा केला जातो. नऊ दिवस साजरा केला जाणारा हा उत्सव पवित्र मानला जातो. या विशेष प्रसंगी देवीची सर्व रुपांची पूजा केली जाते. या काळात अनेक ठिकाणी दांडियाचं (Dandiya) देखील आयोजन केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून दांडियाची क्रेझ मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतंय. देशभरात वेगवेगळ्या भागात दांडियाचं आयोजन केलं जातं. त्यावेळी वेगळवेगळ्या वेशभूषा देखील पहायला मिळते. अशातच आता केरळमध्ये देखील गुजराती दांडियाची क्रेझ (Dandiya in Kerala style) दिसून येतीये. काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.
शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही केरळच्या महिला आपल्या परंपरेच्या स्टाईलमध्ये दांडिया खेळताना दिसत आहे. एका मोकळ्या रस्त्यावर त्यांनी गरब्याचा फेर धरला. गुजराती भगिनींनो लक्ष द्या! या नवरात्रीत, केरळ शैलीतील दांडिया पहा, असं म्हणत शशी थरुर यांनी केरळच्या संस्कृतीचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. केरळची पारंपारिक साडी अन् हातात मोठी काठी घेऊन या महिला गुजराती गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
गरबा का खेळतात?
गुजरातचं पारंपारिक लोकनृत्य म्हणून गरबा या नृत्याला मान्यता आहे, जे भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानलं जातं. गरब्याचा शाब्दिक अर्थ गर्भ दिवा असा होतो. महिलांच्या नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव मानला जातो. गरब्यामध्ये महिलांच्या सर्जनशक्तीची पुजा केली जाते, असं म्हणतात. गरबा म्हणजे जीवनाच्या वर्तुळाचं प्रतिक असं मानलं जातं. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. तसेच या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि या घड्याच्या मधोमध दिवा ठेवला जातो आणि त्याच्या बाजूने फेर धरला जातो. यावेळी नाचत असताना महिला तीन टाळ्या वाजवतात. गुजरातमध्ये काही भागात पारंपारिक वेशभूषेसह दांडियाचा देखील समावेश करण्यात आला.