गोमूत्र आरोग्यासाठी चांगले नाही; संशोधनातून धक्कादायक खुलासा
Cow urine : गोमूत्राबाबत विविध दावे केले जातात. एक मोठा वर्ग गोमूत्र पिणे आरोग्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी खूप फायदेशीर असे सांगत असतो. मात्र आता संशोधनातून मोठा खुलासा झाला आहे.
Cow urine : गेल्या काही वर्षात आपल्या देशात गायीवरुन (Cow) जोरदार राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गोरक्षणापासून ते गोवंशहत्या (Cattle slaughter) बंदीपर्यंत हे मुद्दे जोरदार गाजत आहेत. गायीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि गाय हा किती उपयुक्त पशू आहे हे पटवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतात. अशातच गाईचे गोमुत्र हे किती फायदेशीर आहे हे कायमच सांगितले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये गोमुत्राचे खूप महत्त्व असून अनेक शुभकार्यात गोमुत्राचा वापर केला जातो. तसेच ताजे गोमूत्र अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक आजारांवर उपाय म्हणून गोमुत्र प्यायला दिले जाते. मात्र आता, नुकत्याच झालेल्या संशोधनात मूत्रात धोकादायक जीवाणू असतात, अशी माहिती समोर आली आहे. हे किटाणू माणसांसाठी धोकादायक ठरू शकतात.
उत्तर प्रदेशातील बरेलीस्थित आयसीएआर-इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयव्हीआरआय) या देशातील प्रमुख पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने नुकत्याच केलेल्या संशोधनात ताज्या गोमूत्रात धोकादायक किटाणू असल्याचे समोर आले आहेत. संस्थेतील तीन पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी ही बाब संशोधनातून समोर आणली आहे. निरोगी गायी आणि बैलांमध्ये Escherichia coli सह कमीतकमी 14 प्रकारचे हानिकारक किटाणू असतात. यामुळे पोटात संसर्ग होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
"गाय, म्हशी आणि मानवांच्या 73 लघवीच्या नमुन्यांचे सांख्यिकीय विश्लेषण दाखवते की म्हशीच्या मूत्रातील किटाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायींच्या लघवीपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. म्हशीच्या मूत्राचा एस एपिडर्मिडिस आणि E. rapontici सारख्या किटाणूंवर तीव्र प्रभाव पडतो," असे संशोधन संस्थेतील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख असलेल्या सिंग यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
"कोणत्याही परिस्थितीत मानवी वापरासाठी लघवीची शिफारस केली जाऊ शकत नाही. आम्ही स्थानिक डेअरी फार्ममधून साहिवाल, थारपारकर आणि विंदावणी (क्रॉस ब्रीड) या तीन प्रकारच्या गायींचे लघवीचे नमुने गोळा केले. तसेच म्हशी आणि माणसांचेही नमुने घेतले. आम्ही जून ते नोव्हेंबर 2022 दरम्यान केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे," असे ही सिंग यांनी सांगितले.