रक्त गोठवणाऱ्या थंडीत कसे तग धरणार जवान?
त्यांच्यासाठी केली जातेय खास व्यवस्था
मुंबई : काही महिन्यांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेला अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आला. ज्यानंतर या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास ७० हजार जवान तैनात करण्यात आले होते. ज्या जवानांना आता तेथे पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे. ज्यासाठी आता सर्वतोपरी तयारी केली जात आहे. जम्मू- काश्मीर परिसरात तापमानाचा पारा आणि थंडीच्या दिवसांचा एकंदरस अंदाज घेता काही महत्त्वाच्या सुविधा पुरवल्या जाण्याकडेच सैन्यदलाकडून भर देण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी या जवानांना १ लाख २० हजारहून अधिक अंतर्वस्त्रे, चांगल्या प्रतीचे जॅकेट, स्लीपिंग बॅग आणि जाड चादरी, जवळपास ७० फॅब्रिकेटेड बॅरक आणि १५००हून अधिक हीटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय हजारो लीटर केरोसिन आणि खास पद्धतीची आखणी केलेली शौचालयं यांचीही व्यवस्था या जवानांसाठी केली जाणार आहे.
फॅब्रिकेटेड बॅरकचं म्हणाल तर, प्रत्येक बॅरकमध्ये ४० जवान राहू शकतात. त्यामुळे तेथील वातावरणात ही बाब फायद्याची ठरणार आहे.
अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपीमधील अनेक जवानांच्या तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या.
यापूर्वी काश्मीरच्या खोऱ्या जवळपास ६० हजार जवान तैनात असायचे. सध्याच्या घडीला या भागातील जवानांची संख्या कमी करण्याची कोणतीही चिन्हं केंद्र सरकारच्या निर्णयांतून दिसत नसल्यामुळे आता लक्ष दिलं जात आहे ते म्हणजे या जवानांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधांकडे.