नवी दिल्ली: भविष्यात भारत पाकिस्तानसोबत केवळ PoK (पाकव्याप्त काश्मीर) या एकमेव मुद्द्यावर बातचीत करेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. राजनाथ सिंह यांनी गेल्या काही तासांमध्ये केलेली वक्तव्ये पाहता भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जन आशीर्वाद यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. त्यांनी म्हटले की, काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. त्यामुळे ते संपूर्ण जगासमोर रडगाणे गात आहेत. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भीक घातली नाही, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 


आतापर्यंत अनुच्छेद ३७० ला कोणीही हात लावू शकत नाही, असे लोकांना वाटत होते. भाजपने त्याला धक्का लावला तर पुन्हा सत्तेत येणार नाही, असेही अनेकजण म्हणत होते. मात्र, आम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये अनुच्छेद ३७० रद्द केला. आम्ही कधीही सत्तेचे राजकारण करत नाही. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तसे वचन दिेले होते आणि जीव गेला तरी ते पूर्ण करायचे हा भाजपचा निर्धार होता, असे राजनाथ यांनी म्हटले. 


कलम ३७० हे काश्मीरच्या विकासात अडथळा बनू पाहत होते. त्यामुळे ते हटवण्यात आले. मात्र सध्या शेजारील ही भारताने केलेली चूक आहे असे सांगत आंतराराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. मात्र पाकिस्तानशी संवाद झाला तर तो फक्त त्यांनी दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर होईल. पण आता तो संवाद PoK प्रश्नावरही होणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.