VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण
Telangana Viral Video : तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाजपाने देखील या व्हिडीओवरुन मंत्र्यांवर टीका केली आहे.
Telangana Home Minister Viral Video: तेलंगणाचे (Telangana) गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mohammad Mahmood Ali) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला (Bodyguard) सर्वांसमोर कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पगुच्छ द्यायला उशीर झाल्याने मंत्र्यांने रागाच्या भरात अंगरक्षकालाच मारहाण केल्याचे समोर आलं आहे.
तेलंगणा राज्याचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांना वेळेवर फुलांचा गुच्छ न मिळाल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा कर्मचार्याला मार खावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, अली हे त्यांचे कॅबिनेट सहकारी टी श्रीनिवास यादव यांना मिठी मारताना, सुरक्षा रक्षकाकडे वळताना आणि नंतर त्याला कानाखाली मारताना दिसत आहे. श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अली यांना सुरक्षारक्षकाने वेळेवर पुष्पगुच्छ न दिल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केला. दरम्यान, भाजपाने मंत्र्यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे. टी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, पुष्पगुच्छ वेळेवर न दिल्याबद्दल महमूद अलीने त्यांच्या अंगरक्षकाला कानाखाली मारली. या सगळ्या प्रकारानंतर श्रीनिवास यांनी महमूद अली यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
भाजपाकडून निषेध
दरम्यान, भाजपा नेत्यांनी गृहमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. भाजपाचे खासदार अरविंद धर्मापुरी यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर यावर प्रतिक्रिया दिली आहे, "आचरण अनुकरणीय असले पाहिजे. हे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि हे अत्यंत वाईट उदाहरण आहे," असे खासदार अरविंद धर्मापुरी यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर महमूद अली यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, या प्रकरणी त्यांच्या बाजूने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही कोणतेही वक्तव्य सध्या समोर आलेले नाही.