नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६२ जागा जिंकत दिल्लीचे तख्त राखले. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. भाजपला दिल्लीत केवळ आठ जागाच जिंकता आल्या. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्विकारत दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी तिवारींना पदावर कायम राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याआधी दिल्ली विधानसभेत यंदाही भोपळाही न फोडलेल्या काँग्रेसच्या दिल्ली अध्यक्षांनीही आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. त्यामुळे दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये अनेक उलथापालथी सुरू असल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतमध्ये २१ वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पुन्हा सत्तेत परत येण्याच्या शोधात असलेल्या भाजपला पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणूक २०२०मध्ये मोठा झटका बसला आहे. ७० सदस्यांच्या विधानसभेत पक्षाला केवळ आठ जागा जिंकता आल्या. निवडणुकीतील पराभवाची पराभवाची जबाबदारी स्वीकारत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



विशेष म्हणजे, भाजपचे सर्वोच्च नेतृत्व दिल्लीत असताना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय नेतृत्त्वाची सर्व फौज आणि ताकद असूनही भाजपने केवळ आठ जागा जिंकल्या. पक्षाच्या मोठ्या पराभवानंतर आता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पराभवाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजता महासचिवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.


भाजपचे दोन्ही दिग्गज नेते पक्षाच्या पराभवाचा आढावा घेतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार पराभव झाला आहे. सुमारे २१ दिवस चाललेल्या आक्रमक मोहिमेनंतरही दिल्लीतील पक्षाची नौका बुडाली आहे. निवडणुकीत भाजपने पक्षाच्या सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले होते. केंद्रीय मंत्री दिल्ली पदयात्रा करत होते. तर गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: दिल्लीच्या रस्त्यावर रॅलीही काढली होती, तरीही पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, भाजपाने शाहीन बाग, कलम ३७०, नागरिकत्व सुधारणा कायदा, राम मंदिर यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला मात्र, पदरी पराभव आला.


निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पराभव स्वीकारला आहे. जेपी नड्डा म्हणाले की, भाजपने हा जनतेचा कौल स्विकारला आहे. आमचे आमदार विरोधकांची भूमिका निभावतील आणि राज्याच्या विकासाशी संबंधित प्रत्येक मुद्दे प्रमुखपणे मांडतील.


दिल्ली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शाहीन बागच्या मुद्दय़ावरही पडसाद उमटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा निवडणुकीत प्रत्येक रॅलीत सहभागी झाली होते. तरीही पक्षाला विजय मिळवता आला नाही. या बैठकीत धोरणात्मक चुकांबाबतही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.