नवी दिल्ली : राजधानी दिल्ली स्फोटाचं इराण कनेक्शन समोर येत आहे. तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठितून स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे संकेत मिळातायत. याप्रकरणी पोलिसांकडून सर्व इऱाणी नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचसोबत सर्व हॉटेलांशी संपर्क साधून तिथे राहणाऱ्या इराणी नागरिकांबाबत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून घटनास्थळाचे सीसीटीव्हीही तपासण्यात आले आहेत. स्फोटानंतर दोन संशयित कॅबमधून उतरून संशयास्पद रित्या फिरताना दिसतायत. याप्रकऱणी कॅब चालकांचीही चौकशी करण्यात येत आहे. 


इस्त्रायली दूतावास दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये आहे. इस्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटाची जबाबदारी सध्या कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. मात्र, हा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क केले गेले आहे.



या स्फोटात अद्याप कोणत्याही व्यक्तीच्या जखमीची माहिती नाही. इस्त्रायली दूतावास तुगलक रोड पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर आहे. इस्रायल दूतावासात हा स्फोट घडलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या जवळच असलेल्या बंगला नंबर 6 मधून स्फोटांचा कॉल आला होता. गुप्तचर अधिकारी, विशेष सेल आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.


इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौक येथे यावेळी बीटिंग रिट्रीट चालू होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहे. हा स्फोट कसा झाला आणि कोणी केला याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी त्या भागाला वेढा घातला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.