नवी दिल्ली : शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना संबोधित करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केले आहे. जवळपास ७०० शाळांमध्ये त्यांच्या या भाषणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये केजरीवाल यांनी आपल्या पक्षाला मत देण्याचं आवाहन मतदारांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना करत त्यांना मोदीभक्ती आणि देशभक्ती यांपैकी एक पर्याय निवडण्याची विचारणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोणालाही विचारलं की येत्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाला मत देणार, ते मोदींचं नाव घेतात. मोदींना का मत देणार? असं विचारलं असता ते आम्हाला आवडतात म्हणून त्यांना मत देतो, असं उत्तरही ते देतात. आता तुम्हीच ठरवा, तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे की मोदींवर. मुलांवर प्रेम करत असाल तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना मत द्या आणि जर मुलांवर प्रेम नसेल तर मग मोदींनाच मत द्या', असं ते म्हणाले. मोदींनी तुमच्यासाठी एकाही शाळेची बांधणी केली नसल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. 'एकतर तुम्ही देशभक्तीला साथ द्या किंवा मोदीभक्तीला. कारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होत नाहीत', असं आवाहन त्यांनी पालकांना, थोडक्यात मतदारांना केलं.  



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कशा प्रकारे शाळांची बांधणी होण्याची कामं रोखली आहेत, याची माहिती त्यांनी ट्विटद्वारेही दिली. मोदी सरकारने दिल्लीमध्ये शाळांच्या बांधणीची कामं थांबवली. कसंबसं आता ११ हजार खोल्यांची कामं सुरू आहेत, हा मुद्दा उचलून धरत आपला मत द्या नाहीतर मोदींना मत दिल्यास ते पुन्हा शाळांची बांधणी होण्याची कामं थांबवतील असं म्हणत एका वेगळ्या मर्गाने केजरीवाल यांनी मतदारांकडे मतांची मागणी केली. आता मतदार राजा आपला कौल देणार की मोदींचं नेतृत्वं असणाऱ्या भाजपला, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. कुठे पक्षाची पुनर्बांधणी सुरु आहे, तर कोणी आत्मचिंतन करत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या सत्रालाही नेतेमंडळींनी प्राधान्य दिलं असून शक्य त्या सर्व परिंनी आपलं भवितव्य ठरवणाऱ्य़ा मतदारांना थोडक्यात देशातील जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे.