मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आल्यापासून राजधानीमधील राजकारण तापलं आहे. अरविंद केजरीवाल जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची अटक हुकूमशाही असल्याचं म्हटलं आहे. तसंच अरविंद केजरीवाल जेलमधून बाहेर येऊ नयेत यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली असल्याची टीका केली आहे. हा कायदा नसून, हुकूमशाही आणि आणीबाणी आहे अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आम आदमी पक्षाने म्हटलं आहे की, अरविंद केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन मिळण्याची शक्यता असताना भाजपा घाबरली आणि सीबीआयकडून खोट्या प्रकऱणात अटक करायला लावली. 


सुनीता केजरीवाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "त्यांच्या पतीला मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी 20 जूनला जामीन मिळाला होता. त्यानंतर ईडीने त्यावर स्थगिती आणली. पुढच्याच दिवशी सीबीआयने त्यांना आरोपी केलं आणि आज अटक केली. सगळी यंत्रणा ते बाहेर येऊ नयेत यासाठी कामाला लागली आहे. ही हुकूमशाही, आणीबाणी आहे".



आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला असून, हुकूशाहीने क्रूरतेच्या सर्व पातळ्या गाठल्या असल्याची म्हटलं आहे. दरम्यान सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना राऊज अॅव्हेन्यू कोर्टात नेलं असता तिथे त्यांचं ब्लड शुगर कमी झालं होतं. 


केजरीवाल यांनी न्यायालयाला सांगितलं की, मीडियामध्ये सीबीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन असं दाखवलं जात आहे की, एका वक्तव्यात मी संपूर्ण दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला आहे, सिसोदिया दोषी आहेत किंवा इतर कोणीही दोषी आहेत, असं कोणतंही विधान मी केलेलं नाही. सिसोदिया निर्दोष आहेत, आम आदमी पार्टी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे, असे मी म्हटले आहे .मीडियासमोर आमची बदनामी करण्याचा त्यांचा संपूर्ण डाव असल्याचे त्यांनी सांगितलं. या सर्व गोष्टी सीबीआयच्या सूत्रांद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये पसरवल्या गेल्याची नोंद घ्यावी. सीबीआय या प्रकरणाला खळबळ माजवत असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.