VIDEO : 22 सेकंद, 4 हल्लेखोर अन् लाखो रुपये गायब...;दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
Delhi Crime : दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळं दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत भररस्त्यात घडलेल्या चोरीच्या घटनेनं दिल्ली पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवघ्या काही सेकंदात बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लाखो रुपये घेऊन पळ काढला आहे.
Delhi Crime : दिल्लीत (Delhi News) भर रस्त्यात लुटामार झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळ असलेल्या बोगद्याच्या आत हा दरोडा पडला आहे. या दरोड्याचा (Robbery) थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार दोन बाईकवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी गुडगावला जाणाऱ्या डिलिव्हरी एजंटला आणि त्याच्या साथीदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं आहे. तब्बल दोन लाख रुपये काही क्षणात लुटून चोरट्यांनी पळ काढला आहे. शनिवारी प्रगती मैदानजवळील बोगद्याच्या आत ही घटना घडली.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना शनिवारी (24 जुलै) घडली. एक डिलिव्हरी एजंट आणि त्याचा सहकारी कारने गुरुग्रामला जात असताना प्रगती मैदान बोगद्याजवळ पोहोचल्यावर अचानक दोन दुचाकी कारच्या समोर येऊन थांबल्या. त्यातील चार दरोडेखोरांपैकी एकाने बंदुकीच्या जोरावर कारच्या मागील सीटवरून बॅग काढली आणि चार जण पळून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. मात्र दरोडेखोरांच्या अटकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दिल्लीच्या चांदणी चौकमध्ये असलेल्या ओमिया एंटरप्रायझेसमध्ये साजन कुमार पटेल हा डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात. 24 जून रोजी तो चांदनी चौकातून त्याच्या एक साथीदार जिगर पटेलसह गुरुग्रामला निघाला होता. त्याच्याकडे पैशांनी भरलेली बॅग होती जी त्याला गुरुग्रामला कोणाला तरी द्यायची होती. दोघांनी लाल किल्ल्यावरून ओला कॅब घेतली. रिंग रोडवरून गुरुग्रामला जात असताना प्रगती मैदान बोगद्यात प्रवेश करताच दोन बाईकवरुन आलेल्या चार हल्लेखोरांनी बंदुकीच्या जोरावर कॅब थांबवली. त्यानंतर बंदुक दाखवत बॅग घेऊन पळ काढला.
यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने दिल्ली पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीच्या प्रगती मैदान बोगद्यातील दरोड्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
काँग्रेसने साधला निशाणा
दिल्लीतील या दरोड्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसनेही याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने गृहमंत्री अमित शहा यांना तुमचे पोलीस काय करत आहेत? असा सवाल केला आहे.