दिल्लीत मतदारांचा निरुत्साह; अवघे ५५ टक्के मतदान
आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय रणधुमाळीमुळे घुसळून निघालेल्या दिल्लीत शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान पक्रिया पार पडली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीत तब्बल ५५ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१५ च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास १२ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
२०१५ साली दिल्लीत ६७.०८ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाने (आप) ७० पैकी ६७ जागा जिंकून घसघशीत यश मिळवले होते. मात्र, यंदा मतदानामध्ये दिल्लीकरांचा निरुत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती. दुपारी पाच वाजेपर्यंत अवघे ४५ टक्के मतदानच झाले होते. मात्र, शेवटच्या सत्रात मतदारांनी उत्साह दाखवल्यामुळे मतदानाची टक्केवारी जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. मात्र, २०१५ च्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे आता दिल्लीत नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांकडे लागले होते. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा असून गेल्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे यंदा काँग्रेसच्यादृष्टीनेही ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती. तर दुसरीकडे अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा आक्रमक प्रचार 'आप'ला रोखण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणेदेखील आता महत्त्वाचे ठरेल.