छेडछाडीला विरोध केल्यानं तरुणाला जिवंत जाळलं
राजधानी दिल्ली गुन्हेगारीचीही राजधानी बनलीय. छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणाला भररस्त्यात पेटवून देण्याइतपत गुन्हेगार निर्धास्त झालेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली गुन्हेगारीचीही राजधानी बनलीय. छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणाला भररस्त्यात पेटवून देण्याइतपत गुन्हेगार निर्धास्त झालेत.
काय घडलं नेमकं?
उत्तर दिल्लीच्या सुल्तानपूरमध्ये ही घटना घडलीय. गुरुवारी सायंकाळी नांगलोईच्या सैनी मोहल्ला भागात 21 वर्षीय दिलीप आपल्या मैत्रिणीसोबत जात होता. याचवेळी बाईकवरून जाणाऱ्या तीन तरुणांनी या दोघांना हटकलं. ते तरुण मुलीसोबत छेडछाडीचा प्रयत्न करत होते. परंतु, दिलीपनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्या तीन तरुणांत आणि दिलीपमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली... त्यानंतर ते दिलीपला धमकी देऊन तिथून निघून गेले... पण थोड्याच वेळात ते परत आले. येताना त्यांनी आपल्यासोबत पेट्रोल आणलं होतं.
तरुण गंभीर जखमी
भररस्त्यात दिलीपच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांनी पेटवून दिलं... आणि ते घटनास्थळावरून पसरा झाले. या घटनेत दिलीप 50 टक्के भाजलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप चार्टर्ड अकाऊंटंटचा विद्यार्थी आहे... आणि त्याची मैत्रीण त्याच्या शेजारीच राहते. हे हल्लेखोर कोण होते? याविषयी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. तपासासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेत आहेत.