जिवंत बाळाला रुग्णालयानं मृत घोषित केलं पण...
दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात एका जिवंत बाळाला मृत घोषित करण्याची धक्कादायक घटना घडलीय.
नवी दिल्ली : दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात एका जिवंत बाळाला मृत घोषित करण्याची धक्कादायक घटना घडलीय.
एका महिलेनं दोन प्रिमॅच्युअर जुळ्या बाळांना जन्म दिला होता. यातील दोन्ही बाळांना डॉक्टरांनी मृत घोषित करुन त्यांचे मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून आई-वडीलांकडे दिले.
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना प्लॅस्टिकच्या पिशवीतील हालचालीमुळे एक बाळ जिवंत असल्याचं पालकांच्या लक्षात येताच त्यांनी बाळाला तातडीनं पिशवीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
एक मुलगा आणि एक मुलगी अशी ही जुळी बाळं होती. यातील मुलगा जिवंत आहे.
दरम्यान या घटनेनंतर पालकांनी याप्रकरणी रुग्णालयावर गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीमधील शालिमार बाग इथल्या मॅक्स रुग्णालयात काल सकाळी या दोन बाळांचा जन्म झाला होता.