... म्हणून राष्ट्रपती भवनात माकड शिरला
एका जखमी माकडाने शनिवारी राष्ट्रपती भवनात अचानक प्रवेश केला आणि एका सभागृहात लपल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : एका जखमी माकडाने शनिवारी राष्ट्रपती भवनात अचानक प्रवेश केला आणि एका सभागृहात लपल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती भवनात शिरलेला माकड हा जखमी अवस्थेत होता. या माकडाने राष्ट्रपती भवनातील एका सभागृहात आश्रय घेतला. माकड सभागृहात असल्याचे राष्ट्रपती भवानाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाईल्डलाईफ एसओएसला सूचना देण्यात आली.
त्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनंतर जखमी माकडाला पकडण्यात आलं. त्या माकडाच्या अंगावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे त्याला पकडल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आलं.
वाईल्डलाईफ एसओएसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण यांनी सांगितलं की, या माकडाला कुणीतरी मारहाण केली असावी. त्यानंतर त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी राष्ट्रपती भवनात प्रवेश केला असावा.
या जखमी माकडावर आमच्या टीमचे दोन सदस्यांनी खूपच सावधानतेने पकडलं, जेणेकरुन त्याला जास्त त्रास होऊ नये. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत आणि उपचार पूर्ण झाल्यावर त्याला सोडण्यात येईल असेही कार्तिक सत्यनारायण यांनी सांगितले.
माकडाने केली मेट्रोची सफर
काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका माकडाने प्रवेश केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हे माकड वायलेट लाईन येथील बाटा चौका स्टेशनहून मेट्रोत प्रवेश केला होता. मात्र, त्या माकडाने कुणालाही नुकसान पोहोचवलं नव्हतं. याच दरम्यान एका व्यक्तीने मेट्रोत फिरणाऱ्या या माकडाचा व्हिडिओ शूट केला होता.