नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील कलम 370 रद्द केल्याचे पाकिस्तानच्या अद्यापही पचनी पडलेले दिसत नाही. पण याला भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. दिल्ली परिवहन निगम (डीटीसी) ने दिल्ली-लाहोर बस सेवा रद्द केल्याची माहीती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. डीटीसीची एक बस सोमवारी सकाळी 6 वाजता लाहोरसाठी रवाना होणार होती, पाकिस्तानने आपल्याकडून बस रद्द केल्यानंतर आता भारतही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरसाठी शेवटची बस शनिवारी सकाळी रवाना झाली होती. यामध्ये दोन प्रवासी होतो. ही बस त्याच दिवशी संध्याकाळी परतली आणि येताना 19 प्रवाशांना घेऊन आली. रविवारी बस बंद होती. 


दिल्ली लाहोर बस सेवा ही पहिल्यांदा फेब्रुवारी 1999 मध्ये सुरु झाली होती. पण 2001 मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ही बंद करण्यात आली. जुलै 2003 मध्ये पुन्हा सुरु करण्यात आली. यावर्षी फेब्रुवारीतील पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याच्या उत्तरात बालाकोट हवाई हल्ला यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण झाले. यानंतर बस सुरु होती पण त्यामध्ये प्रवाशांची संख्या फार कमी होती.



भारताचा पलटवार 


पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडून स्वत:चे जास्त नुकसान करुन घेतले आहे. पाकिस्तानला सर्वाधिक फळे आणि भाजीपाला पुरवणाऱ्या आझादपूर बाजारपेठेत भारतीय व्यापाऱ्यांनी माल न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. टोमॅटो व्यापार संघाचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटारी-वाघा मार्गावरुन पाकिस्तानात दररोज ७५ ते १०० ट्रक टॉमेटो जात होते. मात्र या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी टॉमेटोची निर्यात थांबवली आहे. 


अन्य भाजीपाला, फळे, सुती धागे यांचे व्यापारीही या मार्गावरुन व्यापार थांबवत असल्याची माहिती आहे.


व्यापारी संबंध संपवल्याचा परिणाम केवळ टॉमेटोवरच नाही तर बटाटे, कांदे आणि हिरव्या भाज्यांवरही होऊन त्याही महागल्या आहेत. 


पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडलेच. याशिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेली समझौता एक्स्प्रेसही रोखण्याचा निर्णय घेतला. वाघा बॉर्डरवरुन जाणारी दिल्ली-लाहोर बससेवाही स्थगित केली आहे.


इम्रान खान सरकारकडून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.


पाकिस्तानने १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्रदिनी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानने तिथे असणाऱ्या भारतीय राजदूतांना मायदेशी जाण्याचे आवाहनही केले आहे.