एक्स्प्रेस-वेवर Mercedes डिव्हायडरला धडकल्याने जळून खाक; उद्योजकाचा होरपळून मृत्यू
Express Highway Accident: हा अपघात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला. आधी ही भरधाव वेगातील मर्सिडीज कार समोरच्या कंटेनरला धडकली आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला जाऊन धडकली.
Delhi- Mumbai Express Highway Accident: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर (Delhi- Mumbai Expressway) एक भीषण अपघात झाला आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर शनिवारी मध्यरात्री राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये एका मर्सिडीज कारने पेट घेतला. आधी भरधाव वेगातील ही कार कंटेनरला धडकली. या धडकेमुळे नियंत्रण सुटल्याने कारने डिव्हायडरला धडक दिली. त्यामुळेच कारने पेट घेतला. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या एका उद्योगजकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात एक उद्योजक गंभीररित्या जखमी झाला असून तो थोड्यात बचावला. या व्यक्तीवर जयपूरमध्ये उपचार सुरु आहेत.
नक्की घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॉडल टाऊन येथील रहिवाशी असलेले राजन गुप्ता यांचा अलवरमधील एमआयए येथे राज सोल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा तेल शुद्धीकरणाचा प्लॅण्ट आहे. गुप्ता हे शनिवारी मध्यरात्रीनंतर आपलं काम संपवून आपल्या एका कर्मचाऱ्याबरोबर मर्सिडीज कारने अलवरवरुन दिल्लीला जात होते. यावेळेस मसारी कठूमर येथील रहिवाशी तुलसीराम शर्मा हा कर्मचारीही गुप्ता यांच्याबरोबर होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नौगावा पोलिस स्टेशनजवळच्या मुनपुर कर्मला येथील गावाजवळ ही कार समोर चालत असलेल्या कंटेनरला धडकली.
कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढलं
कार कंटेरनला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली आणि डिव्हायडरला धडकली. डिव्हायरला धडकल्याने कारला भीषण आग लागली. या अपघातानंतर कारमधील दोघेजण बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोघांनाही वेळेत बाहेर निघता आलं नाही आणि ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एक्स्प्रेस हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी संतलाल हे आपल्या टीमबरोबर रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकेल्या दोघांना बाहेर काढण्यात आलं. या दोघांचा चेहरा होरपळला होता.
कंटेनरचालक फरार
वेळीच या दोघांना बाहेर काढण्यात आलं. या दोघांना बाहेर काढण्यानंतर कार संपूर्ण जळाली आणि जणू आगीच्या गोळ्यासारखी दिसू लागली. थोड्या वेळाने ही आग विझवण्यात यश आलं. दोन्ही जखमींना बाडौदामेव आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अलवरला पाठवण्यात आलं. मात्र अलवर गंभीररित्या जखमी झालेल्या राजन गुप्ता यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तुलसीराम यांना पुढील उपचारांसाठी जयपुरला पाठवण्यात आलं आहे. तिथे तुलसीराम यांच्यावर उपचार सुरु आहे. कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. कंटेनरचालक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.