Delhi Murder: हातात गंडा, गळ्यात रुद्राक्ष का घालायचा? प्रेयसीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिलने सांगितलं कारण
Delhi Murder Case: दिल्लीतल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी साहिलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियावर आरोपीच्या फोटोवर एक नवा वाद निर्माण झाला आहे.
Delhi Murder Case: दिल्लीतल्या शाहबाद डेरी हत्याकांडातील आरोपी साहिल सरफराजला (Sahil Sarfaraz) पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. अटकेनंतर आरोपी साहिलचा एक फोटो चर्चेत आहे. या फोटोत साहिलच्या हातात गंडा आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ दिसत आहे. साहिल गंडा आणि रुद्राक्ष का वापरत होता, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) चौकशीत साहिलने स्वत: यावर खुलासा केला आहे. साहिलने आपला गुन्हा देखील कबुल केला आहे.
गंडा आणि रुद्राक्ष का?
दिल्ली हत्याकांडातील आरोपी साहिलने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरुन साहिलने हातात गंडा घातला होता. तर हरिद्वार ट्रीपवर (Haridwar) गेला असताना द्याने रुद्राक्षाची माळ खरेदी केली होती. साहिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होता. अनेक रिल्स बनवून तो इन्स्टाग्रामवर शेअर करायचा. गळ्यात रुद्राक्ष माळ असलेला एक स्वत:चा व्हिडिओही त्याने इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. बॅकग्राऊंड म्यूझिकला त्याने शिवभक्तीचं गाणं वापरलं होतं.
दारू प्यायला, मोबाईल फेकला
प्रेयसीची हत्या करण्याआधी साहिल भरपूर दारु प्यायला होता. दारुच्या नशेत साहिलने त्या अल्पवयीन मुलीवर वार केले. त्यानंतर तिचं डोकं दगडाने ठेचलं. यात त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी साहिलने आपला मोबाईल स्विचऑफ केला, त्यानंतर तो मोबाईल एका सुमसाम जागेवर फेकून दिला. मोबाईलमधलं सिमकार्ड काढून ते दुसऱ्या ठिकाणी लपवून ठेवलं. पोलिसांनी आरोपी साहिलचा मोबाईल जप्त केला असून सिम कार्ड अद्याप सापडलेलं नाही. सिम सापडल्यानंतर या प्रकरणात अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. हत्येपूर्वी साहिल कोणाशी बोलला होता? त्या मुलीत आणि साहिलमध्ये काही बोलणं झालं होतं का? या गोष्टी उघड होतील.
हत्येआधी साहिल कोणाशी बोलला?
दरम्यान, हत्येआधीचं एक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. ज्यात त्या मुलीची हत्या करण्याआधी साहिल एका मुलाशी बोलताना दिसत आहे. बराचवेळ त्या दोघांमध्ये बोलणं सुर आहे, त्यानंतर तो मुलगा निघून जातो आणि साहिल त्या गल्लीतच थांबलेला पाहिला मिळतोय. हा मुलगा नेमका कोण आहे? या प्रकरणाशी त्या मुलाचा काय संबंध आहे? या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत.
मुलाशी बोलल्यानंतर साहिल तिथेच थांबतो आणि काही वेळातच त्या मुलीवर चाकूने हल्ला करतो. तब्बल वीस वेळा साहिलने चाकूने त्या मुलीवर वार केले त्यानंतर तिच्या डोक्यात दगड टाकून तिची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर साहिलने बुलंदशहरातून बस पकडली आणि दिल्लीतून तो फरार झाला. पोलिसांनी चोवीस तासात त्याला अटक केली.