Delhi Murder Case: राजधानी दिल्लीमधील (Delhi) हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. 20 वर्षीय आरोपी साहिल खानने (Sahil Khan) 16 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केली होती. आरोपीने तब्बल 22 वेळा तरुणीला चाकूने भोसकलं आणि नंतर डोक्यात चार वेळा दगड घातला होता. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) आरोपीला अटक केली असून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने हत्येची कबुलीही दिली आहे. दरम्यान, हत्या केल्यानंतर आरोपी हत्येच्या ठिकाणी म्हणजे रोहिनीमधील (Rohini) शहाबादमध्ये (Shahabad) फिरत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास अर्धा तास तो बिनधास्तपणे परिसरात वावरत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवळच्या पार्कमध्ये काही वेळ बसला होता. यावेळी त्याने हत्येसाठी वापरलेला चाकूदेखील आपल्या हातात ठेवला होता. पार्कमध्ये बसल्यानंतर तो रिथालासाठी रवाना झाला. या ठिकाणी त्याने आपला चाकू फेकून दिला. पोलिसांनी सांगितलं आहे की, त्याने जंगल परिसरात चाकू फेकून दिला आणि नंतर आपला मोबाइल स्वीच ऑफ करुन टाकला.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहील यानंतर ई-रिक्षाने समयपूर बदलीसाठी रवाना झाला. तिथे त्याने मेट्रो स्थानकावर रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो समयपूर बदली येथून आनंद विहारला गेला. यानंतर त्याने बसने बुलंदशहर गाठलं. पोलीस अटक करण्याची भीती असल्याने त्याने रस्त्यात अनेक बस बदलल्या. 


पोलिसांनी सोमवारी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून साहिलला अटक केली आहे. पोलीस चौकशीत त्याने आपल्याला हत्येचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे. या चौकशीदरम्यान हत्येनंतर त्याने नेमकं काय केलं हा सगळा खुलासा झाला आहे. 


नियोजित हत्या होती का?


दिल्ली पोलिसांनी ही हत्या रागाच्या भरात झाली असल्याचा दाव्यावर शंका उपस्थित केली असून, हा पूर्वनियोजित कट होता असा असे संकेत दिले आहेत. याचं कारण म्हणजे, साहिलने 15 दिवसांपूर्वी हरिद्वार येथून चाकू विकत घेतला होता, 


दरम्यान अटकेनंतर साहिलला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. गुरुवारी साहिलला दंडाधिकारींसमोर हजर केलं जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना अद्यापही हत्येत वापरण्यात आलेला चाकू तसंच मोबाइल अद्याप सापडलेला नाही. 


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, साहिल वारंवार आपला जबाब बदलत आहे. चौकशीदरम्यान, त्याने पोलिसांना सांगितलं आहे की, तरुणीची एका दुसऱ्या तरुणाशी चांगली मैत्री झाल्याने आपण चिडलो होतो. हत्येच्या आदल्या दिवशी त्याची तरुणीशी भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात चांगलंच भांडण झालं होतं. यावेळी तरुणीच्या मित्राने साहिलला तिच्यापासून लांब राहण्यास सांगितलं होतं. 


साहिलने दिलेल्या या माहितीची सत्यता पोलीस तपासणार आहेत. याशिवाय सीसीटीव्हीत दिसलेल्या सर्व साक्षीदारांचीही पोलीस चौकशी करणार असून त्यांचे जबाब तपासले जाणार आहेत.