अरे बापरे! ट्रॅफिकचे नवे नियम लागू, नियम तोडल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला असून नियम मोडल्यास खावी लागेल तुरुंगाची हवा
नवी दिल्ली : देशात तुम्ही कुठेही फिरत असाल तर तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागतो. पण ही वाहतूक कोंडी (traffic jam) टाळण्यासाठी दिल्ली सरकारने (Delhi Government) एक तोडगा काढला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाने (Delhi Transport Department) दिल्लीत नवा नियम लागू केला आहे.
एक एप्रिलपासून नवा नियम लागू
1 एप्रिलपासून दिल्लीच्या 15 मुख्य रस्त्यांवर खाजगी, डीटीसी आणि क्लस्टर बसेससह अवजड वाहनं फक्त बस लेनमधूनच (Delhi Bus Lane) जाऊ शकतील. या नियमाचं उल्लंघन केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जर तुम्ही तुमची दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन बस लेनमध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला देखील 5 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
या मार्गांवर नियम लागू
1 एप्रिलपासून मेहरौली-बदरपूर रोडमधील अनुव्रत मार्ग टी-पॉइंट ते पुल प्रल्हादपूर टी-पॉइंटपर्यंत, मोती नगर ते द्वारका मोर, ब्रिटानिया चौक ते धौला कुआं, कश्मीरी गेट ते अप्सरा बॉर्डर, आश्रम चौक ते बदरपूर बॉर्डर, जनकपुरी ते मधुबन चौक या मार्गावर हा नियम लागू होणार आहे.
अवजड वाहनांसाठी सध्या नियम
एक एप्रिलपासून दिल्लीत हे नियम लागू झाले असून सध्ये केवळ बस आणि अवजड वाहनांसाठी हा नियम असणार आहे. पंधरा दिवसांनंतर हा नियम सर्व वाहनांसाठी लागू असेल. नियमांचं काटेकोर पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्र्र्रॅफिक पोलिासांची तब्बल 50 पथकं शहराच्या विविध भागात तैनात केली जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिल्ली परिवहन विभागाने हे नियम लागू केले आहेत (Delhi Transport Department Rule).लहान वाहनांच्या चालकाने कोणताही नियम मोडल्यास पहिल्यांदा त्यांना 5 हजारांचा दंड भरावा लागेल आणि हीच चूक पुन्हा केल्यास दंडाची रक्कम वाढून 10 हजार किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा असा असेल. याशिवाय लायसन आणि परमीटही रद्द होऊ शकतं.
अवजड वाहन चालकाने नियम मोडल्यास त्याला पहिल्यांदा 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. या चुकीची पुनरावृत्ती झाल्यास त्यांचा लायसन आणि परवाना रद्द होऊ शकतो.
दिल्लीचे नागरिक खुश
हा नियम लागू झाल्यामुळे दिल्लीतील जनता खूप खूश आहे. कारण दिल्लीत वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही विशेष व्यवस्था नव्हती आणि आता हा नियम लागू झाल्याने त्यांची वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल अशी प्रतिक्रिया दिल्लीतील नागरिक व्यक्त करत आहेत. आता दिल्लीकर या नियमांचे किती पालन करतात, हे येत्या काही दिवसांत दिसून येईल.
येत्या काळात दिल्ली सरकारकडून एक व्हॉट्सअॅप नंबरही जारी केला जाणार आहे. जर चालकाने नियमांचे उल्लंघन केले तर लोकं त्याचा व्हिडिओ पाठवू शकतात. हा व्हिडिओ पुरावा मानून परिवहन विभाग कारवाई करू शकते.