दिल्ली : दिल्लीतल्या नोएडा भागात काही दिवसांपूर्वी एका साडेसहा वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात अज्ञाताने बंदूकीने गोळी झाडल्याची घटना घडली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या साडेसहा वर्षांच्या या मुलीचं नाव रोली असं असून तिने मृत्यूपूर्वी पाच जणांना जीवनदान दिलं. एम्सच्या (AIIMS) इतिहासत अवयव दान करणारी रोली ही सर्वात लहान डोनर ठरली आहे. 


एम्सचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. दीपक गुप्ता यांनी सांगितलं की, साडेसहा वर्षांची रोलीला 27 एप्रिलला  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला गोळी लागली होती आणि गोळी मेंदूत अडकली होती. त्यामुळे रोली जवळजवळ ब्रेन डेड अवस्थेतच होती. त्यानंतर डॉक्टर्सने कुटुंबियांना याची माहिती दिली.


त्यानंतर डॉक्टर्सच्या टीमने मुलीच्या पालकांसोबत अवयवदानाबाबत चर्चा केली, त्यांचं समुपदेशन केलं. इतर मुलांचे प्राण वाचवण्यासाठी अवयव दान किती महत्वाचं आहे हे रोलीच्या कुटुंबियांनाही पटलं आणि त्यांनी अवयव दानाला संमती दिली. 


कुटुंबियांच्या या निर्णयामुळे रोलीने जाता जाता पाच मुलांना जीवनदान दिलं. आमची मुलगी जगात नसली तरी तिचं अस्तित्व कायम राहिल या,  इतर मुलांच्या जीवनात हास्य पसरवेल अशी प्रतिक्रिया रोलीच्या आई-वडिलांनी दिली.


रोलीवर कसा झाला हल्ला?
नोएडातल्या पुस्ताजवळच्या गावात हे कुटुंब राहतं. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रोलीचे वडिल हरी नारायण रात्रीचे जेवण करून विश्रांतीसाठी पलंगावर झोपले होते, तर त्यांची मुलगी रोली ही त्यांच्या बाजूला होती. अचानक मोठा आवाज झाला, हरी नारायण यांनी पाहिलं तर त्यांच्या मुलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.


वास्तविक अज्ञाताने झाडलेली गोळी भिंतीला आपटून रोलीच्या डोक्यात घुसली. गोळी कुणी आणि का झाडली याचा तपास पोलीस करत आहेत.