निर्भया बलात्कार प्रकरणीच्या खटल्याला नवं वळण; आता...
दाखल करण्यात आलेल्या `त्या` याचिकेनंतर
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे. ज्याअंतर्गत दिल्लीच्या पटियाला सत्र न्यायालयाने निर्भयाच्या कुटुंबीयांची याचिका स्वीकारत त्यावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. बलात्कारातील चारही आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात येण्याची मागणी करत हे सर्व प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांच्या ताब्यात देण्याची मागणी याचिकेतून समोर ठेवली होती. हीच याचिका स्वीकारत आता हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश अरोरा यांच्याकडे पाठवण्यात आलं आहे.
बलात्कार प्रकरणी चार दोषींच्या फाशी प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी निर्भयाच्या कुटुंबीयांनी १६ नोव्हेंबरला पटियाला सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. निर्भयाच्या पालकांच्या वकील सीमा समृद्धी कुशवाहा यांनी याविषयीची माहिती दिली.
न्यायाधीशांच्या अनुपलब्धतेमुळे याप्रकरणीचा निवाडा होण्यास अधिक वेळ दवडला जात असल्याचं म्हणत कुशवाहा यांनी आपल्या पक्षाने न्यायालयाचं दार ठोठावल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या दोन्ही न्यायाधीशांची बदली झाली आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची सुनावणी पुढे जात नव्हती. परिणामी आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्याचं निर्भयाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
तिहार कारागृहातून याप्रकरणीच्या दोषींना ३१ ऑक्टोबरला एक नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यानुसार त्यांच्याकडून याचिका दाखल करण्यात न आल्याच सात दिवसांत त्यांना फाशी देण्यात येणं अपेक्षित होतं.
माणुसकीला हादरवणारं कृत्य...
१६ डिसेंबर २०१२ मध्ये दक्षिण दिल्लीत एका चालत्या बसमध्ये सहाजणांनी २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. या अतिशय अमानवी कृत्यामुळे साऱ्या देशात संतापाची लाट उसळली.
माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य करणाऱ्यांना थेट फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी साऱ्या देशाने उचलून धरली. याप्रकरणी दोषींमध्ये सहाजणांपैकी एक हा अल्पवयीन होता, ज्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. पुढे त्याची सुटकाही झाली. तर, एका आरोपीने कारावासातच आत्महत्या केली होती. आता उर्वरित चार आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर न्यायाधीश काय निर्णय सुनावणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष असेल.