दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह त्यांच्या 150 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. सोमवारी रात्री त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सिंघू बॉर्डर येथून सर्वांना ताब्यात घेतलं. सोनम वांगचुक यांनी केंद्रशासित प्रदेश लडाखला विशेष दर्जा देण्याची मागणी केली असून, यानिमित्ताने 700 किमी दूर 'दिल्ली चलो पदयात्रा' करत आहेत. सोनम वांगचुक आपल्या सहकाऱ्यांसह हरियाणातून दिल्लीमध्ये दाखल होताच त्यांना रोखत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा दाखल देत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी कारवाईला दुजोरा दिला असून, त्यांना दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम वांगचुक यांनी स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. सोनम वांगचुक यांनी एक्सवर 2 मिनिटं 26 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मला दिल्ली सीमेवर 150 जणांसह ताब्यात घेण्यात आलं आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा मिळावा यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर आणि राजघाटसह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यासाठी हे सर्वजण दिल्लीत दाखल झाले होते.



हा चक्रव्यूह कधी तुटणार - राहुल गांधी


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "सोनम वांगचुकजी आणि पर्यावरण, घटनात्मक अधिकारांसाठी शांततापूर्ण मोर्चा करणाऱ्या लडाखच्या नागरिकांना ताब्यात घेणं योग्य नाही. लडाखच्या भविष्यासाठी उभे राहणाऱ्या वयस्कर नागरिकांना दिल्लीच्या सीमेवर ताब्यात का घेतलं जात आहे? मोदीजी शेतकऱ्यांप्रमाणे हे चक्रव्यूहदेखील तुटेल आणि तुमचा अहंकारही मोडेल. तुम्हाला लडाखचा आवाज ऐकावा लागेल".



अरविंद केजरीवाल यांची पोस्ट


दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कधी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जाते. कधी ते लडाखच्या लोकांना थांबवतात. दिल्ली हा एकाच व्यक्तीचा वारसा आहे का? दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्लीत येण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. ते निशस्त्र शांतताप्रिय लोकांना का घाबरतात?



पोलीस काय म्हणाले?


उत्तर-बाह्य जिल्ह्याचे डीसीपी रवी कुमार सिंह यांनी सांगितलं की, दिल्लीत कलम 163 लागू आहे. अशा स्थितीत हे सर्व लोक एकत्र दिल्लीच्या हद्दीत घुसत होते. कलम 163 लागू असताना 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकत नाहीत. पोलिसांनी सोनमसह एकूण 126 जणांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना दिल्ली पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांना रात्री उशिरापर्यंत कोठडीत ठेवण्यात आलं होतं. कलम 163 चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय दिल्ली पोलिसांनी सीमेवर सतर्कता वाढवली आहे. दिल्लीत कलम 163 लागू करण्यासोबतच अलर्टही जारी करण्यात आला आहे. सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


सोनम वांगचुक 1 सप्टेंबर रोजी सुमारे 130 लोकांसह लडाखमधून निघाले. यावेळी ते हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, मनाली, कुल्लू, मंडी, चंदीगड मार्गे दिल्लीच्या सीमारेषेवर पोहोचले . सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक सातत्याने लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.