#CAA #NRC विरोधात राजधानीत भडका, आंदोलकांकडून जाळपोळ सुरू
दिल्ली गेट आणि दरियांगज भागात विरोध प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांनी एका गाडीला पेटवून दिलं
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship (Amendment) Act ) आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (National Register of Citizens) विरोधात राजधानी दिल्लीत भडका उडालाय. ठिकठिकाणी आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आलीय. CAA विरोधात राजधानीत दिल्ली गेट आणि दरियांगज भागात विरोध प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांनी एका गाडीला पेटवून दिलं. ही आग विझवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला.
दिल्ली स्थित जामा मस्जिदजवळ शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आलं. कलम १४४ धुडकावून लावत अनेक ठिकाणी जमाव एकत्र झाला आणि प्रदर्शन करू लागला. या आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक महिलांचाही समावेश होता. शांततेच्या मार्गानं जाणाऱ्या या आंदोलनानं दिल्ली गेट आणि दरियागंज भागात मात्र हिंसक वळण गेतलं. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केलीच शिवाय डीसीपी स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या एका कारला पेटवून देण्यात आलं.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध इंडिया गेट, जंतर मंतर, जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासही संपूर्ण दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू आहे. यामुळे पोलिसांकडून काही महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले. तसंच काही संवेदनशील ठिकाणीही बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
नागरिकत्व कायदा आणि एन आर सी विरोधात दिल्ली गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शुक्रवारीही जामा मशिद ते जंतर मंतर असा मोर्चा काढण्यात आला. जामा मशीद इथून या मोर्चाला सुरुवात झाली. कडक पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा सुरू झाला. दिल्लीतल्या जामिया, चांदनी चौक, सीमलपूर भागात पोलिसांची विशेष नजर आहे.