BREAKING : पाक प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांसह 6 जणांना अटक, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, दिल्लीत मोठी कारवाई
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दहशतवादी कारवाई करण्याचा या दहशतवाद्यांचा होता कट
नवी दिल्ली : दहशतवादविरोधातील मोहिमेत दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळालं आहे. स्पेशल सेलने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली इथं वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांचा आयएसआय आणि अंडरवर्ल्ड मॉड्यूलशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये घेतलं प्रशिक्षण
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये झालं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ओसामा आणि झिशान अशी या दहशतवाद्यांची नावं असल्याचं सांगितलं जात आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठी दहशतवादी घटना घडवण्याची या दहशतवाद्यांची योजना होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी करत होते.
अटक करण्यात आलेले दहशतवादी देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून आयईडी आणि आरडीएक्स देखील जप्त करण्यात आले असून यातील दोन दहशतवाद्यांचे कनेक्शन अंडरवर्ल्डशी असल्याची माहिती मिळेतय.
दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारी सकाळी एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. यानंतर, महाराष्ट्रातून एक संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर दोन दहशतवाद्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की ते मस्कतमार्गे पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते आणि त्यानंतर ते भारतात स्लीपर सेल म्हणून काम करत होते.
पोलिसांनी सांगितले की, हे दहशतवादी सणासुदीच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये आयईडी स्फोट घडवण्याचा विचार करत होते. तसंच त्यांनी पाकिस्तानमध्येच बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी दोन गट तयार करून कार्यरत होते, ज्यात एकाचे काम फंडिंग गोळा करणं आणि दुसऱ्या गटाचं काम शस्त्रे गोळा पुरवणं होतं.