नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीन बागमध्ये मागील १०० दिवसांपासून सुरु असलेलं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनावर आज कारवाई करण्यात आली. आंदोलनासाठी बसलेल्या लोकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांची फौज मंगळवारी शाहीनन बागमध्ये पोहोचली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीन बागमध्ये मोठा फौजफाटा तैनात करत येथील तंबु हटवण्यात आले. दिल्ली पोलिसांसोबत अर्धसैनिक दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता धोका पाहता हे तंबु हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्रीपासूनच या ठिकाणी कारवाईसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या.



दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, कोरोनामुळे अनेक शहरात लॉकडाऊन आहे. दिल्लीमध्ये ही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आम्ही शाहीन बागच्या लोकांना विनंती केली की त्यांनी ही जागा खाली करावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंदोलनासाठी बसलेल्या लोकांना शांतीच्या मार्गाने समजवलं. कारण येथील लोकांच्या आरोग्याला देखील धोका आहे.



दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सगळ्यांना मिळून यावर नियंत्रण मिळवायचं आहे. त्यामुळे शांतीपूर्ण मार्गाने ही जागा खाली करण्यात आली. आम्हाला हा रस्ता देखील मोकळा करायचा आहे. कारण अम्ब्युलन्ससह इतर महत्त्वांच्या वस्तूंची वाहतूक करता यावी. असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.



कोरोनामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. सातही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन आहे. याआधी रविवारी संपूर्ण देशामध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता. शाहीन बागच्या लोकांनी देखील याचं समर्थन केलं होतं. पण त्यानंतर आता फक्त ५ महिला आंदोलनाला बसतील असा निर्णय़ घेण्यात आला आहे.