देशविरोधी घोषणाबाजी : कन्हैया कुमारविरोधात आरोपपत्र दाखल
९ फेब्रुवारी २०१६ ला दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा तत्कालिन अध्यक्ष कन्हैया कुमार, तेथील विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या संदर्भात झी न्यूजने प्रसारित केलेल्या वृत्ताच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पतियाळा हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
९ फेब्रुवारी २०१६ ला दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सामील असणाऱ्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा तत्कालिन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह काही काश्मिरी तरुणांना आरोपी ठरविण्यात आले होते. घटनेच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच ११ फेब्रुवारी २०१६ ला या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याप्रकरणी कन्हैया कुमारसह दुसऱ्या आरोपींना अटकही झाली होती. आता तीन वर्षांनंतर दिल्ली पोलीस या प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात घटनेच्या वेळची दृश्ये, मोबाईलमधील दृश्ये, त्यासंदर्भातील फेसबुक पोस्ट, घटनास्थळी उपस्थित जेएनयू प्रशासनातील लोक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी, विद्यापीठाचे सुरक्षारक्षक आणि उपस्थित विद्यार्थी यांच्याकडे केलेल्या चौकशीच्या आधारे आरोपपत्र तयार केले आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर देशात भाजप सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त झाला होता. पोलिस सत्ताधारी भाजपच्या आदेशावर काम करीत असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. या प्रकरणी दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक म्हणाले, तपास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाचा तपास क्लिष्ट होता. वेगवेगळ्या लोकांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांना इतरही राज्यात जावे लागले.
जेएनयूतील या कार्यक्रमामुळे देशातील लोकांमध्ये नाराजी पसरली होती. कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्यामुळे सर्वच स्तरांतून त्याचा निषेध करण्यात आला होता.