दिल्लीतला हिंसाचार सुनियोजित, विरोधकांनी दंगल भडकवली- अमित शाह
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडलं आहे.
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडलं आहे. लोकसभेमध्ये अमित शाह यांनी दिल्लीतल्या हिंसाचारावर भाष्य केलं. दिल्लीतला हिंसाचार हा सुनियोजित कट होता, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे. दंगल करणारा कोणताच व्यक्ती वाचणार नाही, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.
वारिस पठाण आणि उमर खालीद यांच्या वक्तव्यांमुळे दंगल भडकली, काँग्रेस नेत्यांनीही आर-पारच्या लढाईची भाषा केली होती, असं अमित शाह लोकसभेत म्हणाले. मंदिर जळल्यानंतर जेवढं दु:ख झालं, तेवढच दु:ख मशिद जळल्यानंतरही झाल्याची भावना अमित शाह यांनी व्यक्त केली.
दिल्ली दंगलीवर बोलताना अमित शाह यांनी शिख दंगलीवरून काँग्रेसवर टीका केली. शिख दंगलीमध्ये ३ हजार जणांचा मृत्यू झाला, तेव्हा काँग्रेसने काय कारवाई केली? असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला.
दिल्ली हिंसाचारात ५२ भारतीयांचा मृत्यू झाला. २५ फेब्रुवारी रात्री ११ नंतर दिल्लीमध्ये हिंसा झाली नाही. दिल्लीत दंगल झालेल्या भागाची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास होती. १२ पोलीस स्टेशन परिसरात हिंसा पसरली होती. ४ टक्के भागामध्येच हिंसेला रोखण्यात आलं. उत्तर प्रदेशामधून ३०० दंगलखोर आले, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
नागरिकतेच्या नावावर मुस्लिमांची दिशाभूल करण्यात आली. हिंसाचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी हिंसाचारावर ३६ तासांमध्ये नियंत्रण मिळवलं, असं विधान अमित शाह यांनी केलं.
दिल्ली हिंसाचारावेळी अमित शाह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात होते, असे आरोप विरोधकांनी केले होते. हे आरोप अमित शाह यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्या सांगण्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हिंसा झालेल्या भागात गेले. मी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान दिल्ली पोलिसांसोबत होतो आणि वारंवार बैठका घेत होतो. मी ट्रम्प यांच्यासोबत आग्र्याला गेले नाही किंवा लंच आणि डिनरही केला नाही, अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिली.
हिंसा झालेल्या भागात मी गेलो असतो, तर पोलिसांनी मलाच सुरक्षा दिली असती. ज्या गल्ल्यांमध्ये दंगल झाली, तिकडे बाईकही जाऊ शकत नाही, असं अमित शाह म्हणाले.
२७ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ७०० पेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले. हे एफआयआर दोन्ही समुदायांच्या लोकांविरुद्ध आहेत. २,६४७ लोकांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावरून दंगलीचे व्हिडिओ मागितले. दंगलग्रस्त भागात अजूनही ८० कंपन्या तैनात आहेत. २४ तारखेला रात्री १० वाजता उत्तर प्रदेशची सीमा सील करण्यात आली, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.