दिल्लीत धुरक्यामुळे लांब पल्ल्यांची वाहतूक कोलमडली, विमानप्रवासावरही परिणाम
सकाळी 7 अंश सेल्सिअस वातावरण नोंदवण्यात आलं
नवी दिल्ली : दिल्लीतील एनसीआरसह अनेक भागात धुरक्याची चादर पसरली आहे. धुरक्यामुळे दिल्लीतील वातावरण अतिशय धुसर झालं असून समोरचं चित्र देखील अस्पष्ट दिसत आहे. दिल्लीतील धुरक्याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे.
दिल्लीतील धुरक्यामुळे 22 रेल्वे उशिराने धावत आहेत. उत्तर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसेच खराब वातावरणामुळे 5 विमान सेवा दिल्ली विमानतळावरून वळवण्यात आली आहे. धुरकट वातावरणात विमान उतरवणं योग्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीची सकाळ झालीच ती मुळी गारठ्यात. दिल्लीमध्ये सकाळी 7 अंश सेल्सिअस वातावरण नोंदवण्यात आलं. दिल्लीतील थंडी ही खास असतेच त्यामुळे दिल्लीकर या थंडीचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बारापुला फ्लायओव्हरवर धुरकं पसरलं असल्यामुळे रस्ता अस्पष्ट दिसत आहे. या रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्या देखील अतिशय धीम्या गतीने जात आहेत.
थंडी वाढल्यामुळे दिल्लीतील एनसीआरसह अनेक भागात प्रदूषणाचा स्तर खराब झाला आहे.