नवी दिल्ली: ऑर्डरला उशीर झाला म्हणून ऑर्डर करणारे डिलिव्हरी बॉयवर चिडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच डिलिव्हरी बॉय आणि हॉटेल मालकात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. संतापाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं रेस्टॉरंट मालकाचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा डिलिव्हरी बॉय एका नामांकित फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. त्याने थेट रेस्टॉरंट मालकावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑर्डरच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्याने फूड डिलिव्हरी बॉय आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. तिथल्या रेस्टॉरंट मालकानं या दोघांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात त्याने मालकावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर डिलिव्हरी बॉय फरार झाला आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिलिव्हरी बॉयने झमझम रेस्टॉरंटमध्ये चिकन बिर्याणी आणि पूरी भाजीची ऑर्डर दिली होती. त्यावेळी एक ऑर्डर तयार होती. तर दुसरी ऑर्डर तयार होण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे डिलिव्हरी बॉय संतापला. त्याने भांडण उकरून काढलं आणि रागाच्या भरात गोळीबार केला. 


जखमी सुनील अग्रवाल यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रिपोर्टनुसार डिलिव्हरी बॉय नशेत असल्यानं हा प्रकार झाल्याचं सांगितलं जात आहे. या डिलिव्हरी बॉयविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी फरार असून पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.