मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आता कुठे देश बाहेर येत असताना डेल्टा प्लस व्हायरसनं धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. जगातील 85 देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा कहर सुरू झालाय. भारताही डेल्टा प्लसचे रूग्ण वाढू लागलेत. डेल्टा प्लसच्या धोका लक्षात घेता ICMRच्या तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रत डेल्टा प्लस विषाणूच्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त होत आहे. विशेष करून लस न घेतलेल्या लोकांमध्ये 'डेल्टा' हा विषाणू अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. राज्यात सध्याच्या घडीला डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आहे, या सर्व रुग्णांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून त्यांच्यापैकी एकाच रुग्णाने लसीकरणाचा एक डोस घेतला असल्याची माहिती उजेडात आली आहे. 


देशात आतापर्यंत 'डेल्टा प्लस'चे 49 रुग्ण सापडलेत. 'डेल्टा प्लस' रोखण्यासाठी केंद्रानं पावलं उचलायला सुरूवात केली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना 8 राज्यांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 'डेल्टा प्लस'चे 21 रुग्ण सापडलेत. यापैकी बहुतेकांचं लसीकरण झालेलं नव्हतं असं समोर आलं आहे. 'डेल्टा प्लस' रुग्ण सापडलेल्या जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वेगानं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत


डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येईल का, याबद्दल देशातल्या शास्त्रज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. ICMR चे माजी वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांनी डेल्टा प्लसबद्दल सावध राहण्याचा इशारा दिलाय. मात्र डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येईल का याबद्दल सध्या ICMR कडे ठोस उत्तर नाही. 10 राज्यात 49 रुग्ण सापडले, याचा अर्थ तिसरी लाट सुरू झालीय, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असं ICMR नं स्पष्ट केलंय. तर ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेत, त्यांनीही मास्क घालायलाच हवा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायलाच हवं, नागरिकांनी तातडीनं लसीकरण करून घ्यावं, असा इशारा WHO नं दिलाय.


लवकरात लवकर लसीकरण आणि कोरोना नियमांचं काटेकोर पालन हाच सध्यातरी डेल्टा प्लसला रोखण्याचा मार्ग आहे हे निश्चित.