ITR : आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी आता फक्त 5 दिवस उरले आहेत. सरकारने 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. जसजशी शेवटची तारीख जवळ येत आहे, तसतशी तारीख वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे 'Extend Due Date Immediately' असं ट्विटरवर ट्रेंड होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटीआर भरताना आयकर विभागाच्या पोर्टलवर काही समस्या येत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तर काही इतर कारणांसाठी शेवटची तारीख वाढवण्याची विनंती करत आहेत. मागील वर्षी देखील करदात्यांनी पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींबाबत ट्विटरवर अशाच प्रकारे प्रचार केला होता.


लोकांनी आयटीआर पोर्टलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि पोर्टल पुन्हा डाउन झाल्याचे लिहिले आहे. आयकर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षीची शेवटची तारीख वाढवल्याचे उदाहरणही करदाते देताना दिसत आहेत.


31 जुलैनंतर दंड आकारला जाईल


आयकर विभाग करदात्यांना त्यांचा आयटीआर भरण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे विभागाकडून सांगण्यात येत आहे. 31 जुलैनंतर आयटीआर दाखल केल्यास, करदात्याला दंड भरावा लागेल. या अंतर्गत तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर दंडाची रक्कम 5,000 रुपये असेल. तर 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपये दंड भरावा लागेल.


तारीख वाढवण्यास विभागाचा नकार


आयकर विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की यावेळी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली जाणार नाही. रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी विभागाच्या आयटीआर पोर्टलवरील अनियमितता तपासण्यासाठी नियमित आढावा घेतला जात आहे.


आतापर्यंत 3 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर भरला आहे. त्याच वेळी, वीकेंडमध्ये 40 लाख आयटी रिटर्न भरले गेले. आयकर विभागाने करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.