नवी दिल्ली: लोकशाही ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. त्यांनी बुधवारी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक अनुभव सांगितला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये अफगाणिस्तानमधील खासदारांचे एक शिष्टमंडळ आले होते. हे शिष्टमंडळ भारतीय संसदेचा कारभार कसा चालतो, हे पाण्यासाठी लोकसभेत आले होते. प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीत बसून ते संसदेचे कामकाज पाहत होते. मात्र, त्यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ आणि आरडाओरडा सुरु होता. अफगाणिस्तानचे सर्व खासदार हा प्रकार पाहत होते. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की, आपण सगळे किती किंचाळत आणि ओरडत आहोत. किमान अफगाणिस्तानचे खासदार सभागृहात असताना आपण शांतपणे कारभार चालवू शकत नाही का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर राहुल गांधी सभागृहातून बाहेर पडले तेव्हा खासदारांचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले. तेव्हा राहुल गांधी यांनी सभागृहातील गोंधळाबद्दल त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हे ऐकून शिष्टमंडळातील एक महिला खासदार अचानक रडायला लागली. राहुल गांधी यांनी तिला रडायचे कारण विचारले. तेव्हा खासदार महिलेने म्हटले की, तुम्ही या सभागृहात शाब्दिक वाद घालता. पण आमच्याकडे हे सर्व बंदुकीच्या जोरावर चालते, अशी खंत तिने व्यक्त केली. 



यावरुन लोकशाही व्यवस्था आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे राहुल गांधी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. लोकशाही ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे आपण कोणतेही मोल देऊन या व्यवस्थेचे रक्षण केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.